मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पेपरफुटी झाली, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. खोटे बोला, पण रेटून बोला, हे त्यांचे धोरण आहे. खोटे बोलून एखाद्या निवडणुकीत मते मिळाल्याने आता खोटेच बोलायचे, या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला आहे. त्यांनी दिलेल्या पत्राविषयी एका वाक्यात सांगायचे, तर आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे, असं हे पत्र आहे.”
“सर्वात जास्त पेपरफुटी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेली आहे आणि ते आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत. खोटे नरेटिव्ह तयार करण्याची फॅक्टरी त्यांनी उघडली आहे त्याचा पर्दाफाश आम्ही अधिवेशनात करु. या पत्रात त्यांनी सांगितलं की, विदर्भातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश. पण अडीच वर्ष सरकार असताना ज्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही. ते आम्हाला सांगतात की, विदर्भातील प्रकल्प मार्गी लागले नाहीत. याऊलट आम्ही बहुतांश प्रकल्पाचं काम सुरु करुन अनेक प्रकल्प पुर्णत्वाला आणले आहेत,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “वैधानिक विकास मंडळ, मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी बंद केले. आता तेच विचारत आहेत, की वॉटर ग्रीडचे काय झाले? आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल केला आहे. त्यांना विनंती केली आहे की, ‘हर घर जल’मध्ये याचा समावेश करा. जे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत, ते त्यांनी स्वतःला विचारावेत. अधिवेशनात त्यांना उत्तर देऊच. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे की एक बोट आमच्याकडे करत असले, तरी चार बोटे त्यांच्या दिशेनेच आहेत,” असेही फडणवीस म्हणाले.