Devendra Fadnavis : ५ वर्षात फडणवीसांच्या संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या

Devendra Fadnavis Property: राज्याची विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आमनेसामने येणार आहेत. युती-आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती समोर आली आहे. त्यानुसार जाणून घेऊया फडणवीसांची एकूण संपत्ती किती.

उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांकडे ३ कोटी ७८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलं होतं. अशातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि अन्य तपशील जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्म नुसार २०२२ – २०२३ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ९२ लाख ४८ हजार ०९४ रुपये इतके होते. तर २०२३ – २४ मध्ये हा आकडा ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतका आहे. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपये तर मुलगी दिविजाची संपत्ती १० लाख २२ हजार ११३ रुपये असल्याचे सांगितले.

फडणवीस कुटुंबाकडे सोने किती?

प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत, ज्याचे मूल्य ३२ लाख ८५ हजार इतके आहे. तर पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे अलंकार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची संपत्ती असून त्यांच्या नावावर ६२ लाखांचे कर्जही आहे. त्यांच्या नावावर एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.