---Advertisement---
मनोज माळी
तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असून, निसर्गाचा एक आगळा वेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. डाब आणि वालंबा परिसरात शुक्रवारी (दि.१९ डिसेंबर) पहाटे तापमानाचा पारा प्रचंड घसरल्याने दवबिंदू गोठून सर्वत्र बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरली होती. खळ्यातील तांदळाच्या चाऱ्यावर आणि गवतावर साचलेल्या या बर्फामुळे स्थानिकांना ‘काश्मीर’ची अनुभूती येत आहे.
साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सातपुड्याच्या या दुर्गम भागात दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया पाहायला मिळते. मात्र, यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच थंडीने रौद्र रूप धारण केल्याने सुमारे १५ दिवस आधीच हा चमत्कार घडला आहे. शुक्रवारी पहाटे डाब,वालंबा परिसरातील नदीकाठी आणि शेतात गवत, पेंढा तसेच उभ्या पिकांवर बर्फाचे थर साचलेले दिसून आले. इतकेच नव्हे तर घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या टपावरही बर्फ साचला होता.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तापमान ४ अंशा पेक्षा खाली जाते, तेव्हाच दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. सातपुड्याच्या या पट्ट्यात दरवर्षी अशी स्थिती निर्माण होते, मात्र या परिसरात तापमान मोजण्याची कोणतीही अधिकृत यंत्रणा किंवा केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे नेमके किती अंश तापमान खाली घसरले, याची अचूक नोंद मिळत नाही.
डाब परिसरात दरवर्षी कडाक्याची थंडी असते, मात्र यंदा ती वेळेआधीच सुरू झाली आहे. शासनाने या भागात तात्काळ तापमापक यंत्र कार्यान्वित करावे, जेणेकरून येथील हवामानाची अचूक माहिती सर्वांना मिळेल असे स्थानिक नागरिक व शेतकरी यांचे म्हणने आहे.
थंडीचा हा कडाका पर्यटनासाठी सुखद असला, तरी कडाक्याच्या थंडीमुळे आणि दवबिंदू गोठल्यामुळे परिसरातील पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषत तांदूळ काढणीनंतर उरलेला चारा आणि इतर पिकांना या अतिथंडीचा फटका बसू शकतो.









