तरुण भारत लाईव्ह । तालुक्यातील निगदिचा कुंड्यापाडा येथे आंब्याच्या बागेत चोरून गांज्याचे पिके घेणाऱ्यास धडगाव पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. यात एकूण ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
शुक्रवार दि. ३१ मार्च २०२३ रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका व्यक्तीने त्याच्या आंब्याचे झाडे असलेल्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करीत असल्याची खात्रीशीर खबर मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण व त्यांचे अमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी निगदीचा कुंड्यापाडा गावाचे शिवारात आंब्याचे झाडे असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर आंब्याच्या शेतात एक व्यक्ती हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथुन पळ काढला. परंतु, धडगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. पोलीसांनी आंब्याचे झाडे असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले. यावेळी धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे संपूर्ण शेतातून ६४८ किलो ५० ग्रॅम वजनाचे ४५ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीची एकुण ४७९० गांजाची झाडे मिळुन आलीत. ही गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली. तसेच आरोपी रुपजा सिंगा पाडवी रा. निगदीचा कुंड्यापाडा ता. धडगांव जि. नंदुरबार यांचेविरुद् धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 50/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 20 (ब). (ii), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस हवालदार पुष्पेंद्र कोळी, राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोलीस नाईक शशिकांत वसईकर, दिपक वारुळे, पोलीस अंमलदार मनोज महाजन, विनोद पाटील, रितेश बेलेकर, गणेश मराठे, जानसिंग वळवी, सायसिंग पाडवी, प्रतापसिंग गिरासे, सुनिलकुमार सुर्यवंशी यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाच्या पथकाचे अभिनंदन केले आहे..
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी निमित्त नंदुरबार येथे आले होते. त्यांनी मांडलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या संकल्पनेची सुरूवात नंदुरबार येथून करण्यात आली. नंदुरबार शहरातील विविध शाळातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना याप्रसंगी अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली होती. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात गांजा, अफु इत्यादी प्रकारच्या अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड, विक्री करणायांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.