न्याय द्या ! धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. त्यांच्या हत्येनंतर गावात सातत्याने मोर्चा काढण्यात येत आहे मात्र अद्याप न्याय मिळाला असल्याने आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. हे आंदोलन जवळपास दोन तासांपासून सुरु होते.

धनंजय देशमुख यांनी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी उपस्थित असलेल्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी नवनीत कॉवत यांच्याशी संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेतले. टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांना मिठी मारत हंबरडा फोडला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं, त्यांना फाशी द्या,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

संतोष देशमुख यांची मुलगी, वैभवी देशमुख, याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली, “आम्ही शांततेत न्याय मागतोय, तरीही आम्हाला न्याय का मिळत नाही?” तिने पोलिसांकडून अधिक माहिती आणि तपासाच्या स्थितीविषयी निराशा व्यक्त केली आणि धमकी दिली की, “आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करणार.”

कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवण्याची अपेक्षाही व्यक्त करत, वैभवी देशमुखने तीव्र शब्दांत प्रश्न उपस्थित केला, “आमचं एक सदस्य गेले, मग आम्ही काय करायचं?” तसेच, धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंब यांचे धैर्य आणि संघर्ष न्याय मिळवण्यासाठी निरंतर चालू आहे.