राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) या दुर्मिळ आजाराने ते ग्रस्त असल्याचे निदान झाले आहे. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलणे कठीण जात आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काय आहे धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची स्थिती?
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर त्यांना डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, त्याच दरम्यान बेल्स पाल्सी या आजाराचे निदान झाले.
हेही वाचा : कोण जिंकणार भारत की पाकिस्तान? आयआयटी बाबाची अजब भविष्यवाणी
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा एक प्रकारचा स्नायू विकार आहे. यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा होतो किंवा हालचाल करण्यास त्रास होतो. यामुळे बोलणे, खाणे आणि चेहऱ्याच्या हालचालींवर परिणाम होतो. हा आजार सहसा तात्पुरता असतो, पण वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
धनंजय मुंडे यांचे ट्विट – प्रकृतीविषयी माहिती
धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विटद्वारे त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे –
“माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे मला सध्या सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही.”
सध्या उपचार सुरू
सध्या धनंजय मुंडे यांच्या उपचारावर रिलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या आजारातून लवकर बरे होण्यासाठी त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे