---Advertisement---
Dharangaon News : गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले, वृद्ध आणि दमा विकाराने ग्रस्त असलेल्या साऱ्यांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस लागवडीस मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्यंतरीच्या काळात वारा-वादळ व बेमोसमी पाऊस झाला. त्यात शेतशिवारातील अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. पोलदेखील शेतात आडवे पडले. त्यामुळे शहर व परिसरातील शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी व तोंडी स्वरूपात तक्रारी दिल्या. परंतु अजूनही विजेचा प्रवाह सुरळीत झालेला नाही.
परिणामी शेतकरी वर्गातून मोठा संताप व्यक्त होत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील भोणे येथे विजेच्या लपंडावामुळे गाव आणि शिवार या दोन्ही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या. याकडे वीज मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. त्वरित वीजपुरवठा सुरळीत न केल्यास ग्राम स्थांकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
भोणे येथील शेतशिवारात वीज नसल्याने काही शेतकऱ्यांनी थेट डिझेल पंप विकत घेऊन पिकांना पाणी देण्यास प्रारंभ केला. यामुळे धरणगाव येथील महावितरणचा भोंगळ कारभार उघड होत आहे. गत ३ ते ४ महिन्यांपासून भोणे येथे विजेचा लपंडाव सुरू आहे. गावात नागरिकांना तर शेतात शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने भोणे गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
धरणगाव येथील वीज मंडळातील उप कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे ते दुर्लक्ष करतात. मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर प्रशासनाचा वचक नाही. यामुळे भोणे येथील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही भोणे गावातील समस्या सुटत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न शेतकरी, नागरिक व महिलांकडून उपस्थित केला जात आहे.