महाविकास आघाडीचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

जळगाव :  दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.5/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे यासह जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

हे आंदोलन जळगाव जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघटना, समविचारी पक्ष, समविचारी संस्था यांच्या माध्यमातून  पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, गजानन मालपुरे, माजी महापौर जयश्री महाजन, वैशाली सूर्यवंशी, लकी टेलर, गायत्री सोनवणे, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मंगला पाटील,  वाय. एस. महाजन सर, गोपाल दर्जी, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत मागण्या 

दुधाला रू.30/- प्रति लिटर भाव व रू.5/- प्रति लि. चा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावांना देखील रु.5/- प्रति लिटर चे अनुदान मंजूर करावे.

जळगाव जिल्ह्यातील 6686 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विमा नुकसान भरपाई शासनाने नाम मंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील पिक विमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊन देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत तात्काळ नुकसान भरपाई मंजूर होणे बाबत.

जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेला अनुदान कुठलेही निकष न लावता सरसकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे. शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केलेल्या असून परंतु त्याचा लक्षात कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही तसेच ज्वारी साठवणे साठी गोदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने तात्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी.

वरील मागण्या मान्य होईपर्यंत जळगाव जिल्हा महाविकास आघाडीचे सर्व नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्था धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.  मागण्या मान्य होईपर्यंत धरणे आंदोलन संपुष्टात येणार नाही असा निर्धार केला असून कुंभकर्णी झोप घेत राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी एल्गार पुकारला असल्याचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.