शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी उद्या जळगावात धरणे आंदोलन

जळगाव : दूध उत्पादकांना शासनाने जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपये अनुदान, कापूस व सोयाबीन उत्पादकांना दहा हजारांचे अनुदान यांसह विविध चार मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. याविरोधात बुधवारी 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

यंदाच्या खरिपासाठी केंद्र सरकारकडून कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी आदी पिकांच्या हमीभावात खूपच कमी वाढ जाहीर केली आहे. त्यातच राज्य सरकारने केळीसह कापूस व इतर पीकविम्यासह शेतमाल हमीभावही कमी जाहीर करीत शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा केंद्र व राज्य सरकारवर रोषही आहे. पीकविम्याचे प्रस्ताव नाकारलेल्या सहा हजार 686 शेतकर्‍यांना न्याय देण्यासह दूध उत्पादनाकांना जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, कापूस व सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टरी पाच हजारांऐवजी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, ज्वारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, या मागण्यांसाठी शेतकरी संघटना, महाविकास आघाडी व समविचारी संघटनांच्या माध्यमातून बुधवारी (10 जुलै) सकाळी दहाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष पाटील यांनी केले आहे.