मोठी बातमी! धीरज साहूंच्या खजिन्याचा अहवाल समोर

नवी दिल्ली : झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. यामध्ये ओडिशातून सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय सापडलेली बहुतांश रोकड संबलपूर, तितलागड या भागातूनही जप्त करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर आयकर विभागाचा अहवाल समोर आला आहे. यात आयकर विभागाने सांगितले की, जप्त केलेल्या 351 कोटी रुपयांपैकी, 329 कोटी रुपये ओडिशातील छोट्या शहरांमधील मोडकळीस आलेल्या इमारतींमधून जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे लपविलेल्या चेंबर्समध्ये आणि घरांमध्ये, ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील सुदापाडा आणि टिटलागढ आणि संभलपूर जिल्ह्यातील खेतराजपूरसह लहान शहरांमध्ये असलेल्या एका निवासस्थानात लपवून ठेवण्यात आले होते.
रोख रकमेव्यतिरिक्त, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात अनेक पुरावे सापडले आहेत. छाप्यांदरम्यान 100 हून अधिक आयटी अधिकारी उपस्थित होते आणि जप्त केलेल्या रोकड मोजण्यासाठी 40 हून अधिक मशीन्स तैनात करण्यात आल्या होत्या. ही रोख रक्कम गेल्या 42 वर्षांतील सर्वात मोठी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कर अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीनंतर, त्यांना बेहिशेबी रोकड, अज्ञात रोख पावत्यांवरील पद्धतशीर माहिती आणि देशी दारूच्या न नोंदवलेल्या विक्रीचे संदर्भ सापडले.
दीपक साहू आणि संजय साहू यांच्यासह आणखी 2 मद्यविक्रेत्यांवर बालंगीर जिल्ह्यातील टिटीलागड येथे छापा टाकण्यात आला. साहू बंधूंच्या आवारातून आयटीने 11 कोटींची रोकड जप्त केली. कंपनीच्या संबळपूर युनिटवर छापे टाकून 37.5 कोटी सापडले.