धुळे : सहलीसाठी गेलेल्या आठवीच्या दोघा विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निमडाळे येथे शुक्रवार २३ रोजी घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हितेश सूर्यवंशी-पाटील (वय १४) व मयूर वसंत खोंडे (वय १४, दोघे रा. ता. जि. धुळे) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. निमडाळे येथील जयहिंद शाळेच्या इयत्ता आठवीचा विद्यार्थी हितेश सूर्यवंशी-पाटील व मयूर वसंत खोंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची वनभोजनासाठी सहल गेली होती. यावेळी परिसरात तलावासह खदान होती. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दोघे हितेश व मयूर हे तलावात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडायला लागले.
यावेळी शिक्षकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान, तेथील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांना बाहेर काढून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दोघे मुलांना मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम होता. या सहलीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. गौण खनिजाच्या उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला पाठविला आहे. दरम्यान, दोन्ही मुले तलावात कशी बुडाली, घटनेच्या वेळी शिक्षक नेमके कुठे होते, शिक्षण विभागाकडून सहलीची परवानगी घेतली होती का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगण्यात आले.