Dhule Crime : पुणे ते धुळे लक्झरी बसने प्रवास करणाऱ्या धुळ्यातील महिलेचे दागिने प्रवासात चोरट्यांनी लांबवल्याची घटना गत मार्च महिन्यात घडली होती. धुळे शहर पोलिसात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल करीत मध्यप्रदेशातील चोरट्याला कर्नाटक राज्यातून बेड्या ठोकल्या आहेत. दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान (३४, खैरवा जागीर, कुवाद, म नावर, जि.धार, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्रवासात लांबवले दागिने
शोभा जगतसिंग राजपूत (५९, सिंचन भवनामागे, साक्री रोड, धुळे) या महिला गत मार्च महिन्यात कोथरूड, पुणे येथून धुळ्यासाठी संगीतम ट्रॅव्हल्सच्या बस (एम. एच.१९ सी.आय.५५५९) ने प्रवास करीत असताना कर्वे पुतळा, कोथरूड ते धुळे दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चष्म्याच्या प्लास्टीक बॉक्समधील सोन्याची मंगलपोत, सोन्याचा राणीहार, सोन्याच्या अंगड्या, कानातील कर्णफुल, नथनी आदी लाखोंचे दागिणे लांबवले होते.
धुळे शहर पोलिसात याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे शहर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी गुन्ह्याचे अत्यंत बारकाईने निरीक्षण व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर कर्नाटक राज्यातील चित्रादुर्गा ग्रामीण पोलिसांच्या मदतीद्वारे दौलत उर्फ मुनीर खान बाबू खान (३४, खैरवा जागीर, कुवाद, मनावर, जि.धार, म ध्यप्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून दोन लाख दोन हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त दागिण्यांम ध्ये मंगलपोत, दोन अंगठ्या, कर्णफुल, सोन्याची नथनीचा समावेश आहे. तपास हवालदार बापू कोकणी करीत आहेत.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, हवालदार बापू दामू कोकणी, कॉन्स्टेबल सागर माळी, कॉन्स्टेबल संजय भामरे, कॉन्स्टेबल संदीप ठाकरे आदींच्या पथकाने केली.