धुळे : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर टोल नाक्यावर दोघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतूसासह अटक केली. याप्रकरणी दोघांसह त्यांचा मित्र असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना दोन तरुणांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. २१ डिसेंबर रोजी सोनगीर टोल नाक्यावर शिरपूरकडून धुळ्याकडे येणाऱ्या दुचाकी (एम.एच.१८ सी.एफ.५०१२) वर दोन तरुण येताच झडती घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल मॅझीनसह व दोन काडतुस आढळल्याने ते जप्त करण्यात आले तर संशयीत चेतन जीवन पावरा (१९) व युवराज बापू शिरसाठ (१९, रा.नगावबारी, देवपूर) यांना अटक करण्यात आली. संशयीतांनी त्यांचा मित्र भावेश जोशी (रा. एकतानगर, देवपूर) यांच्या सांगण्यावरुन शिरपूर येथून एकाकडून पिस्टल घेवुन धुळे येथे भावेश जोशी यास देण्यास जात असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २५ हजारांची गावठी पिस्टल, दोन हजाराचे दोन जिवंत काडतूस, युवराज शिरसाठ यांचा दहा हजाराचा मोबाईल व एक लाख २५ हजारांची दुचाकी मिळून एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, आरोपी भावेश मिलींद जोशी याच्याविरुध्द यापुर्वी देवपूर व चाळीसगाव रोड पोलिसात प्रत्येकी दोन गुन्हे
दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, पंकज खैरमोडे, पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, मयुर पाटील यांच्या पथकाने केली.