धुळे : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात नाकाबंदी करण्यात येत आहे. या नाकाबंदीत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी गुटखा तस्करी रोखण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने कारवाई करत जवळपास ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यात धुळे जिल्हयातील पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना याना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. यात जिल्हयातील नाकाबंदी करुन वाहने तपासणी, सराईत गुन्हेगार तपासणी, अवैध दारु, गुटखा, अंमली पदार्थ तस्करी रोखणे, हिस्ट्रीशिटर तपासणीची प्रामुख्याने जबाबदारी दिली होती.
यानुसार अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अधिकारी व अंमलदारांसोबत नाकाबंदी केली. यात त्यांना प्रतिबंधित गुटक्याच्या साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
मुंबई आग्रा महामार्गावरुन इंदौर येथून आयशर ट्रक क्रमांक सीजी ०४ पीएन ४३१८ याच्यात गुटखा असल्याची माहिती मिळाली. यामाहितीप्रमाणे पोलीस उप निरिक्षक विजय पाटील, हवालदार कुणाल पानपाटील, उमेश पवार, पोका विशाल पाटील,धिरज सांगळे, यांच्या पथकाने कारवाई केला. या पथकाने मुंबई आग्रा रोडवर आर्वी दुरक्षेत्रसमोर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणीस प्रारंभ केला. मिळालेल्या माहितीप्रमाणे एक तपकिरी रंगाची आयसर धुळेकडून मालेगावकडे येताना आढळून आली. तसेच मिळालेल्या माहितीनुसार वाहनाची देखील खात्री झाल्याने आलेल्या ट्रकला थांबवुन तिची तपासणी केली असता त्यामध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणा-या गरम मसाल्याच्या गोण्यांच्या आडोशाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा माल मिळून आला . एकुण ५१ लाख ७० हजार ३५० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. गाडी चालक आरोपी फय्याजखान रज्जाकखान (रा. खातेगांव ता. कनोद जि.देवास ) याला ताब्यात घेवून धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार पुढील तपास करीत आहेत.