Dhule Crime News : आचारसंहिता काळात १९ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त

धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते दरम्यान जिल्ह्यात स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत वाहन तपासणी दरम्यान आतापर्यंत १९ कोटी ५० लाख ५६ हजार ९३७ रुपयांची बेकायदा मालमत्ता, संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी नितीन गावंडे यांनी दिली.

निवडणूक आचारसंहितेनुसार राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनी मतदारांना कोणतेही प्रलोभन दाखवू नये, अशी तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विधानसभा मतदारसंघात १ स्थिर सर्वेक्षण पथक (एस.एस.टी.) १ व्हिडिओ व्हिविंग टीम (व्ही.व्ही.टी) आणि १ भरारी सर्वेक्षण पथक (एफ.एस.टी.) असे १५ पथक, पोलीस पथके, जिल्हा व राज्य सीमावर्ती पथके, उत्पादन शुल्क, आयकर, वस्तू व सेवाकर, वनविभाग संयुक्त पथके तैनात आहेत.

जिल्ह्यात निवडणूक आचारसंहितेदरम्यान एफएसटी, एसएसटी, पोलीस दलातर्फे ७३ लाख, १० हजार, तर आयकर विभागातर्फे ८ कोटी, ३८ लाख, २० हजार असे ९ कोटी, ११ लाख, ३० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. एफएसटी, एसएसटी, पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत ३ कोटी, ६ लाख, ९५ हजार, ८२७ रुपयांची अवैध दारू तसेच १ कोटी, ११ लाख, ९ हजार, ५५० रुपयांचे अमली पदार्थ, ४ कोटी, २५ लाख, ३७ हजार, ८२२ रुपयांचे सोने, चांदी, १ कोटी, ९५ लाख, ८३ हजार, ७३८ रुपयांचे साहित्य अशी १९ कोटी, ५० लाख, ५६ हजार, ९३७ रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. म तदारांना प्रलोभन देत मते मिळवण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास, नागरिकांनी सी-व्हिजिल अॅपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.