---Advertisement---

Dhule Crime : फौजीच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू, नातलगांकडून खुनाचा आरोप, देवपूर परिसरातील घटना, संशयित पोलिसांच्या ताब्यात

---Advertisement---

Dhule Crime : शहरातील देवपूर भागात फौजीच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यानंतर फौजीने घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. मात्र, हा प्रकार समजताच तिचे नातलग तेथे पोहोचले व त्यांनी तो डाव उधळून लावला. या वेळी दोन्ही बाजूंच्या मंडळींमध्ये जोरदार वाद उफाळला होता.

‘आमच्या मुलीचा तुम्हीच खून केला आहे.’ असा आरोप तिच्या नातलगांनी केला. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संशयितांना ताब्यात घेतले. बलवाडीतील साईशिल्प वक्रतुंड येथे राहणारा फौजी कपिल बागूल याची पत्नी शारदा ऊर्फ पूजा बागूल (वय ३७) हिची गुरुवारी (२९ मे) दुपारी चारच्या सुमारास प्रकृती बिघडली.

त्यामुळे तिला पती कपिलने देवपुरातील खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी काही तपासण्या करत तिला मृत घोषित केले. त्यानंतर कपिल बागूलने पत्नीचे शव घरी आणले. तसेच शालकाला भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत शारदाच्या मृत्यूची माहिती दिली. तसेच शारदावर आजच अंत्यसंस्कार करावे लागतील, तू एकटा ये. असे सांगत संपर्क बंद केला.

बहिणीच्या मृत्यूची माहिती समजताच शारदाच्या भावाच्या पायाखालची वाळू घसरली. शारदा हिचा पतीकडून छळ सुरू होता. यासंदर्भात महिला तक्रार निवारण केंद्रातही तक्रार करण्यात आली होती. तेव्हा पोलीस ठाण्यापर्यंत वाद गेला होता. मात्र, काही दिवसांपासून ती सामंजस्याने पतीसोबत नांदत होती.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शारदाचे नातलग तिच्या घरी पोहोचले. तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. शारदाचा मृत्यू हा आकस्मिक नसून तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. तिची हत्या झाल्याचा आरोप नातलगांनी लावून धरला. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह जलरोग तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला .

पती रुग्णालयात, नातलग पोलीस ठाण्यात !

शारदा बागूलच्या मृत्यूनंतर कपिलचीही प्रकृती बिघडली. त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कपिलचे नातेवाईक धनेश रमेश माळी, बाजू दुधा बागूल, विजया बाजू बागूल, साखरबाई माळी, रंजना धनेश माळी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. नातलग संतप्त झाले होते. ते शारदाच्या सासऱ्यांवर हल्ला करण्याची भीती बळावली होती. मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका शारदाच्या नातलगांनी घेतली.

२०१० मध्ये झाला होता विवाह

कपिल आणि शारदा यांचा विवाह २०१० मध्ये झाला होता. त्यांना चार्वी आणि चैतन्य अशी दोन मुले आहेत. कपिल बागूल हा पत्नी शारदाचा नेहमी छळ करायचा. शारदाचे माहेर भडगावचे असल्याने तिने छळासंदर्भात जळगाव येथील महिला तक्रार निवारण केंद्रातही अर्ज केला होता. मात्र, ही बाब गांभीर्याने घेण्यात आली नसल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. शारदाकडून वारंवार हुंड्याची मागणी केली जात होती. गुरुवारी सायंकाळी पाचला प्रकृती गंभीर असल्याचे आम्हाला भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आले. लगेच अर्धा तासानंतर ती मृत झाली असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत तिचा खूनच झाला आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, ही आमची मागणी असल्याचे शारदाच्या काकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, तसेच शारदाच्या भावानेही बहिणीच्या छळाची पुष्टी केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment