राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून जळगाव शहरात काल सकाळी 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हिवाळ्याच्या मोसमातील हे सर्वात कमी तापमान असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. तर पुण्यामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राज्यातही थंडी हळूहळू वाढू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात तीन दिवसांपासून गारठा चांगलाच वाढला आहे.
काश्मीरसह हिमाचल प्रदेशातही अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी होत असून उत्तर भारतातील थंडीचा कहर वाढला आहे. त्यामुळे उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे.
शुक्रवारी, धुळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान 6 अंश सेल्सियअची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढताना दिसत आहे. धुळे, परभणी, गडचिरोली आदी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे.
हवामान विभागाने दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात शीतलहरसाठी अलर्ट जारी केला आहे. पंजाबातील 17 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर काहीशी उष्णता वाढू शकते.