धुळे : न्याय्यहक्कांसाठी न्यायालयात जाण्यास पैसे नसल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मोफत वकील सेवेचा गतवर्षी जिल्ह्यातील ५०० लाभार्थीनी लाभघेतला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत समाजातील पात्र घटकांना मोफत विधी सेवा पुरविली जाते. त्यामध्ये वकील सेवेचाही समावेश आहे, तसेच कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. पैसे नाहीत म्हणून कुणीही न्यायापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा उद्देश आहे. गतवर्षी जिल्ह्यामध्ये ५०० लाभार्थीना वकिलासह मोफत विधी सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक ४६७शिबिरे घेण्यात आली आहेत.
यांना मिळते मोफत विधी सेवा
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक, कारागृहात व पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी, मानवी तस्करी, शोषण, भिक्षेकरी व वेठबिगारीचे बळी ठरलेल्या व्यक्ती. औद्योगिक कामगार, मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती, पूर, भूकंप, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्ती, औद्योगिक आपत्ती व जातीय हिंसा पीडित व्यक्ती. तीन लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती.
हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण
यासाठी असते मदत
कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन. कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधित्व व त्यासोबत खटल्यांसाठी मसुदा तयार करणे, मसुदा लेखन, इतर प्रकारचे प्रासंगिक खर्च समाविष्ट असतात. सर्वोच्च न्यायालयात कैद्यांची कागदपत्रे पाठविण्यासाठी मदत. उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी मदत. कायदेविषयक वाद तडजोडीने सोडविणे.
अशी आहे मोफत वकील मिळविण्याची प्रक्रिया
मोफत वकील मिळविण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी विधी सेवा प्राधिकरणाकडे किंवा तालुका न्यायालय विधी सेवा समितीकडे लेखी अर्ज सादर करावा लागतो. अर्जात तक्रारीची संक्षिप्त माहिती किंवा मोफत वकील मागण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती अर्ज लिहिण्याच्या स्थितीत नसल्यास प्राधिकरणाचे अधिकारी तिचे तोंडी निवेदन नोंदवून घेतात. अर्जदारास प्राधिकरणाद्वारे मोफत दिले जाणारे शपथपत्रही निष्पादित करून देणे गरजेचे आहे. प्राधिकरणाचे अधिकारी अर्जदाराने शपथपत्रात सांगितलेल्या माहितीची पडताळणी करून घेतात.
न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्रधिकरणाचे ब्रीदवाक्य आहे. त्या उद्देशाने पात्र लाभार्थ्यांना मोफत विधी सेवा पुरवली जाते. त्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चार विधी सेवा चिकित्सालयांसह ५ फ्रंट ऑफिस कार्यरत आहेत. वकील सेवेचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा.
– संदीप स्वामी (न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे)