---Advertisement---
Dhule News : राज्य शासनाने गेल्या पाच सात वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सुमारे ४ हजार ६० थकीत पीककर्जदार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीककर्ज माफ केले होते. या कर्जमाफीची २८ कोटी ३१ लाख ६१ हजार थकबाकी येणे बाकी होती. ती थकबाकी राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णय ३१ मार्च, २०२६ नुसार धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेस प्राप्त झाली असल्याची माहिती प्रा. शरद पाटील यांनी दिली.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचे सन २०१६-१७ पासूनचे थकीत पैसे सरकारकडे येणे बाकी होते. वाशी, नवी मुंबई येथे झालेल्या राज्य सहकारी बँकेच्या संचालकांच्या बैठकीत धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. शरद पाटील व बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग घेतला.
दि. १३ जून, २०२५ च्या मुंबई येथील राज्य सहकारी बँकांच्या संचालकांच्या बैठकीत बँकेचे संचालक प्रा. शरद पाटील यांनी लक्ष वेधून अडचणीतील बँकांना बाहेर काढण्यासाठी तत्कालिन उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
यासंदर्भात राज्य सरकारकडे जिल्हा बँकांच्या असणाऱ्या मागण्या तसेच नाबार्ड व राज्य सहकारी बँकेशी संबंधीत विविध निवेदने या बैठकीत देवून प्रा. पाटील यांनी या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना दि. २० सप्टेंबर, २०२५ रोजी माजी आमदार व संचालक प्रा. शरद पाटील व शामकांत सनेर यांनी मंत्रालयात या बाबत निवेदन दिले होते.
यात धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २८ कोटी ३१ लाख ६१ हजार रूपयांचा शेतकरी सन्मान योजनेचा कर्जमाफीचा निधी तात्काळ धुळे जिल्हा बँकेला वर्ग करावा, अशी विनंती केली होती. तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच कै. अजितदादा पवार यांनी धुळे जिल्हा बँकेला संबंधीत रक्कम तात्काळ वर्ग करण्याचे आदेश दिले होते.
जिल्हा बँकेने गेल्या ४ वर्षात १९८ कोटी संचित तोट्यावरून हा तोटा १७८ कोटी ५८ लाख रूपयांपर्यत आणला आहे. बँकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत असलेल्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळणार आहे.
यात ४ हजार ६० शेतकऱ्यांची कर्जखाती व ७/१२ उताऱ्यावर असलेले बँक बोजा कमी होवून कर्जखाते ७/१२ उतारा कोरा होणार आहे. धुळे नंदुरबार मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या खरीप हंगामातील वितरीत थकीत कर्ज वसूली करतांना व्याजासह वसूली केली असून वसूलीची टक्केवारी ९३ टक्के इतकी आहे. यापैकी कर्ज माफीचे २८ कोटी रूपये बँकेकडे वर्ग झाल्यामुळे बँकेचा संचित तोटा या वर्षी कमी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निधी जिल्हा बँकेला वर्ग केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत. या कर्जमाफीचा लाभ राज्यातील ९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाना मिळाला आहे.









