अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्यांवर धुळे पोलिसांची करडी नजर ; पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

धुळे : पुणे येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणात अल्पवयीन मुलाला दारू उपलब्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली. पुणे येथे घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दल सतर्कता बाळगण्यासाठी विशेष ड्राईव्ह राबवत आहे. याविशेष मोहिमेत दोन दुकानांवर अल्पवयीन मुलांना दारूची विक्री होत असल्याची घटना उघड झाली आहे. यात संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हि मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी सुरु केली आहे. शहरात अल्पवयीन मुलांना काही दुकानांतुन दारू विक्री केली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती, यानुसार अशा दुकानांवर पोलिसांनी साध्य वेशात विशेष नजर ठेवून आहेत.

यानुसार या पोलिसांनी धुळे शहर उपविभागातील धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील चितोड रोड वरील वाईन शॉप, राजेश व नियती बिअर-बार, पश्चिम देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील वाईन सेंटर वाईन शॉप, नकाणे रोड देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाईन शॉप, आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप, धुळे महानगर पालिका समोरील वाईन शॉप, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील पुनम वाईन शॉप, सत्यम वाईन शॉप, मोहाडी पोलीस ठाण हद्दीतील श्रध्दा वाईन शॉप येथे संबंधीत पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत देवपुर पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र वाईन शॉप आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप येथील मद्यविक्रेते हे बेकायदेशीरपणे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन आले. त्यांच्यावर देवपुर पोलीस ठाणे हददीतील महाराष्ट्र वाईन शॉप येथील चालक जगदीश प्रधानमल गलाणी नोकर ऋतीक भरत शर्मा , मालक विना जगदीश गलाणी यांच्या विरुध्द देवपुर पोलीस ठाणे येथे तसेच आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील क्वालीटी वाईन शॉप येथील मॅनेजर चुनीलाल मंगतराम सेवाणी , सेल्समन विक्की किशनचंद लुंड यांच्या विरुध्द आझादनगर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पवयीन बालकांच्या संरक्षणाचा कायदा हा अत्यंत कठोर आहे. त्यामुळे अल्पवयीन बालकांना दारूची विक्री करू नये किंवा त्यांना दारू पिण्यासाठी प्रवृत्त करू नये. या प्रकारचे गुन्हे केल्यास संबंधितांवर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.