Diabetic Biobank: देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सर्व वयोगटातील लोक याला बळी पडत आहेत. जीवनशैलीतील बदल, अयोग्य आहार आणि व्यायामाच्या कमतरतेमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन (एमडीआरएफ) यांनी भारतातील पहिली डायबेटिस बायोबँक चेन्नईत तयार केली आहे. यामध्ये मधुमेहावर संशोधन आणि त्याच्या उपचारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
बायोबँकचे उद्दिष्ट:
बायोबँकचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मधुमेहाच्या कारणांचा शोध घेणे आणि त्यावर हाय-टेक संशोधन करणे. यामध्ये मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळख कशी करावी, त्याचे प्रभावी उपचार कसे करता येतील याबाबत माहिती मिळवण्यासाठी बायोमार्कर्सचा शोध घेणे समाविष्ट आहे. MDRF चे अध्यक्ष डॉ. व्ही मोहन यांच्या मते, बायोबँक मधुमेहाच्या प्रारंभिक चिन्हांना ओळखण्यात मदत करेल, ज्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक प्रभावी होईल.
डायबिटीज बायोबँकच्या फायद्यांची यादी:
संशोधन आणि अभ्यासात मदत: बायोबँक तयार केल्याने मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी योग्य संशोधन केले जाईल, ज्यामुळे उपचार सुधारण्यास मदत होईल.
प्रतिकूल परिणाम कमी करणे: बायोबँक मधुमेहाच्या प्रारंभिक टप्प्यातून ओळख करण्यात मदत करू शकेल, ज्यामुळे पुढील धोके कमी होऊ शकतात.
जागतिक सहकार्य: भारत मधुमेहावर संशोधन करून इतर देशांना मदत करू शकेल आणि त्याच्याशी सहकार्य साधू शकेल.
स्मार्ट सॅम्पल स्टोरेज आणि डेटा शेअरिंग: हाय-टेक स्टोरेज आणि डेटा शेअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून डायबेटिसवर प्रभावी उपचार शोधण्यात मदत होईल.
डायबिटीज बायोबँकवरील संशोधन:
डायबिटीज बायोबँक अंतर्गत ICMR-Indiab नावाचा अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 1.2 लाख लोकांचा समावेश होता. या अभ्यासामध्ये मधुमेहाचे उच्च प्रमाण आढळले, आणि देशभरातील 10 कोटी लोकांना मधुमेह असल्याचे दिसून आले. दुसऱ्या अभ्यासात तरुणांमधील मधुमेहाच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाची संख्या वाढलेली आहे.