हिरकणी कक्ष ठरताय केवळ ‘शोपीस’

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव –  प्रशासन वा खासगी तसेच परिवहन वा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना विशेष स्थान आहे. परंतु, बहुतांश कार्यालये व परिसरातील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक नसल्याचेच दिसून येत आहेत.

विशेषत: सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला लहान बाळासाठी स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण २०१४-१५ मध्ये तत्कालीन शासन काळात आखण्यात येवून अंमलबजावणी देखील झाली. परंतु हिरकणी कक्षाबाबत सर्वच ठिकाणी प्रशासकिय कार्यालयात ‘उदासीनता आणि मातांनी फिरवलेली पाठ’ या पार्श्वभूमीवर ‘हिरकणी कक्ष उरले फक्त नावालाच’, असे प्रातिनिधिक चित्र दिसून येत आहे.

तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरकणी कक्षाच्या पूर्ततेसंदर्भात आदेश दिले होते. त्याची पूर्तता बहुतांश कार्यालयात झाली देखिल. परंतु, हिरकणी कक्षाची संकल्पना चांगली असली तरी बर्‍याच ठिकाणी प्रभावीपणे राबविली गेलेली नाही. बहुतांश ठिकाणी गेल्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष आहे, याची माहीतीच संबधीत विभागांना नाही, तेथे बोर्ड देखिल नाही. जेथे हिरकणी कक्ष आहेत. ते बर्‍याच वेळा कुलूपबंद असतो, कक्षात अस्वच्छता आणि अडगळ असल्याचे ठिकठिकाणी दिसते. या परिस्थितीत हिरकणी कक्ष बंद आणि रिकामेच आहेत.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत पूर्वी हिरकणी कक्ष होता. परंतु तेथे आता महिला अधिकारी सदस्य वा पदाधिकारी यांच्यासाठी विश्रांती घेण्याचा कक्ष म्हणून वापरात आहे.

महानगरपालिका

शहरात महानगरपालिकेच्या १७ मजली इमारतीत अनेक विभाग आहेत. कामानिमित्त येणार्‍या नागरिकांसह अधिकारी कर्मचार्‍यांना चढ उतार करण्यासाठी थेट १७ व्या मजल्यापर्यंत लिप्टची व्यवस्था आहे. परंतु तेथे देखिल अन्य प्रशासकिय कार्यांलयांप्रमाणेच हिरकणी कक्ष नसल्याचेच चित्र आहे.

सामान्य रूग्णालय

जिल्ह्याच्या मुख्यालयी सामान्य रूग्णालय तसेच तालुका व ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र हिरकणी कक्ष आहे. सामान्य रुग्ण महिला या दवाखान्यांमध्ये येतात, त्यावेळी स्तनपान करताना त्यांची कुचंबणा होत नाही

.
कक्षाचा फायदा

आईनेबाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघर असणे, या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. अशा वेळी हिरकणी कक्षाचा आधार मिळू शकतो. हिरकणी कक्ष असेल तर तेथे बसून माता बाटलीत दूध साठवून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकतील. हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना त्याचा फायदा होऊ शकतो.

बस स्थानक – राज्य परिवहन महामंडळाने शासन निर्देशानुसार स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याची प्रक्रीया केली. परंतु जळगाव बस आगाराच्या ठिकाणी हिरकणी कक्ष केवळ नावालाच आहे. येथे कुठलाही बोर्ड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे स्तनदा मातांची अडचण होत असून, या कक्षाचा उपयोग काय, असा प्रश्न विचारला जात आहे. आगारात प्रवाशी महिलांकडे हिरकणी कक्षासंदर्भात चौकशी केली असता, याबाबत माहितीच नाही असे सांगण्यात आले. यावरून सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मातांची गैरसोय होत असल्याचेच दिसून येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना आणि कार्यालयात काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी कक्ष अत्यंत सुस्थितीत आहे. कक्षातील वातावरण देखिल प्रसन्न आहे. परंतु गेल्या दिड दोन वर्षांपासून या कक्षात संगणक, वापरलेल्या संगणकांचे रिकामे बॉक्स, कुलर वा अन्य अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी या कक्षाचा वापर प्रशासनाकडून केला जात आहे.

सुविधांचा अभाव 

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, महावितरण, ग्राहक मंच, जिल्हा कोषागार कार्यालय, मनपा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग या ठिकाणी हिरकणी कक्ष नाहीत. अनेक निमशासकीय आणि शासकीय कायार्यालयांमध्ये देखील हिरकणी कक्ष सुविधा नाही.