जिल्ह्यात खरोखर भाजपचा विजय झालाय का हो..?

---Advertisement---

 

चंद्रशेखर जोशी
जळगाव दिनांक : ‘पार्टी विथ फिडरन्स’.. अशी भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. तत्वनिष्ठ आणि विकासकेंद्री पक्ष किंवा इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणारा पक्ष, अशीही भाजपची ओळख आहे. मात्र सध्या सुरू असलेली वाटचाल पक्षाच्या मूळ धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारी ठरते आहे. ही भूमिका जणू धोक्याची घंटा ठरू नये, असेच जुण्या कार्यकर्त्यांचे म्हणणे दिसून येत आहे. नुकत्याच जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यातील यशापयशावर सध्या चर्चा सुरू आहेत. केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि प्रचंड संघटन या जोडीला केंद्र व राज्यात घेण्यात आलेले उत्तोमोत्तम निर्णय याचा किती फायदा झाला किंवा घेतला गेला हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या निकालाचे सिंहावलोकन करता भाजपची घोडदौड अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही. जिल्ह्याचा विचार करता अनेक ठिकाणी फारसे समाधानकारक यश मिळालेले नाही आणि काही ठिकाणी इतर मित्र पक्षांचा आधार घेऊनही यश आलेले नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था या केवळ राजकीय सत्तेच्या पायऱ्या नसून त्या जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट जोडलेल्या असतात. या क्षेत्रातील जनतेच्या फार कमी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून असतात. नियमित पाणीपुरवठा, चांगले रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा अशा मूलभूत प्रश्नांवर मतदार आपला कौल देतात. ‘ट्रिपल इंजिन’ सरकारचा नारा मतदारांना प्रभावी वाटला असला तरी जमिनीवरील वास्तव वेगळे असल्याचा संदेश या निकालाने दिला आहे. या निकालामागे विरोधकांची ताकद कारणीभूत आहे काय ? तर अजिबात नाही. मात्र पक्षांतर्गत नाराजी, कुरघोडीचे राजकारण, स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष, आयात केलेल्या व्यक्तींना दिलेले अवाजवी महत्व आणि काही प्रमाणात अंतर्गत असंतोष हे घटकही यशापयशामागे कारणीभूत आहेत. काही ठिकाणी सत्तेच्या जवळ असलेल्यांनाच तिकीट देण्याची प्रत्तृत्ती भोवल्याचेही दिसून येत आहे. जनतेत काही मुद्यांवर स्थानिक पातळ्यांवर उत्तरे मिळू शकलेली नाही. ही सुप्त नाराजीही भोवलेली दिसते.

त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर हे निकाल भविष्यासाठी इशाराच मानावे लागतील. या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हे ठिक आहे मात्र आत्मपरीक्षणही करावे लागणार आहे. आपण एका विचाराशी बांधील आहोत. जनतेचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टिकोण हा वेगळा आहे, याचे भानही गरजेचे आहे. राष्ट्रीय मुद्यांवरील प्रमुख भूमिकेसोबत जनमत सहमत आहे, यात शंका नाही. भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, पाचोरा येथे नगराध्यक्ष निवडून येऊ शकले नाहीत. अमळनेर येथे पक्षाने शहर विकास आघाडी केली होती तो उमेदवारही पराभूत झाला. मात्र मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर हे विजयी झाले. नगरसेवक बऱ्यापैकी निवडून आले मात्र सेनापती पराभूत झाले. ज्या पालिकांच्या क्षेत्रात पक्षाची ताकद आहे, तेथील अपयश हे लक्षवेधी ठरले आहे. तसेच धरणगाव येथे युतीने निवडणूक लढविली गेली तरी पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेना (उबाठा) चा उमेदवार विजयी झाला. जिल्ह्यात फारशी ताकद नसलेल्या पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या उमेदवार भुसावळातून विजयी झाल्या, हा तर मोठाच धक्का आहे. अनेक वर्षे भुसावळकरांनी माजी आमदार संतोष चौधरी यांना दूर ठेवले. त्यांची शक्ती वाढली आहे, याला जबाबदार कोण? याचा विचार करा.

जळगाव जिल्हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र भाजपने गेल्या दोन दशकात मोठे संघटन उभे करून एक-एक गड सर केला व आज हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. नगर पालिका व परिषद निवडणुकीत मतदारांनी पक्षाला आरसा दाखविला आहे. त्यामुळे सावध रहाण्याची गरज आहे. निष्ठावंतांना डावलून चालणार नाही. कारण त्यांच्या कष्टावरच पक्ष आज हे दिवस पहातोय. ‘आयाराम-गयाराम’ हे सत्तेची हवा पाहून टोप्या बदलवितात. भाजपचे विकासाचे व्हिजन आहे, हे त्रिवार सत्य… ते कोणीही नाकारणार नाही. बरेच आयाराम हे पक्ष प्रवेश करताना आम्ही विकासासाठी भाजपसोबत असल्याचे सांगतात, पण त्यांना नेमका कोणता व कुणाचा विकास साधायचा आहे? हे नंतर कळेलच पण सावध व्हा… जिल्ह्यात काँग्रेसची काय वाट लागली. शिवसेना उबाठाची परिस्थिती काय होती? हे पक्ष पुढे येताय. धोका ओळखा व एकत्र रहा…

जाता जाता एक गीत आठवले…
श्रमातून घडतो विकास, सेवेतून येते बळ…
स्वावलंबी भारत घडवू, हाच अढळ निर्धार…
शिस्त, प्रामाणिक कष्ट आणि, कर्तव्याची जाण…
राज्य नव्हे, समाजच घडवेल,
विकासाचे अभियान….!
किमान हे तरी लक्षात ठेवा…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---