धुळे : राज्य सरकाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांना १५०० रुपये दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. यानुसार बँक खात्यातून दोन महिन्याचे तीन हजार रुपये काढण्यासाठी महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आली असून या संदर्भातील निवेदन अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना देण्यात आले.
निवेदनात आशय असा की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. यासाठी महायुती सरकारच्या वतीने लाडकी बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये डीबीटीद्वारे देण्यात येत आहेत. त्या तीन हजार रुपयांमधून एकही रुपया खात्यातून वजा होता कामा नये, असे स्पष्ट आदेश सर्वच बँकांना देण्यात आले असून याबाबत राज्य शासनाने आदेश जारी केला आहे. यासोबतच जेष्ठ महिलांना बँकेत बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी सोय करण्यात यावी. लाडक्या बहिणींना बँक खात्यातून पैसे काढण्यास त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले, महानगरप्रमुख संजय गुजराथी, रेखा साळुंखे, अॅड. मनीषा पाटील, सोनाली सोनवणे, अर्चना जाबले, राजू चौधरी, योगेश मराठे, पंकज चौधरी, प्रतीक शिंदे, प्रवीण मराठे यांच्या सह्या आहे