Pune Dipex 2025 : वारीने गाजलेला हा महाराष्ट्र…, पांडुरंगाची वारी…, लाखों लोकांचा सहभाग…, त्याचप्रमाणे ‘डिपेक्स’ तंत्रज्ञानाच्या विठोबाची वारी आहे. ती तळागाळातल्या माणसाच्या जीवनातील तंत्रज्ञानाला चालना देणारी आहे, असे प्रतिपादन केशवस्मृती सेवा संस्थासमूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर यांनी केले.
पुणे येथे सीओईपी मैदानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित ‘डिपेक्स-2025’चे प्रास्ताविक करताना बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. डॉ. अमळकर म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले की, मी नियतीशी एक करार मांडत आहे. खरे म्हणजे तो प्रसंग आणि आजचा प्रसंग यात अंतर आहे, असे मला वाटत नाही. यास कारण असे आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठे, कुलगुरू, तंत्रज्ञान जाणणारे, तंत्रज्ञान शिकणारे, समाजपरिवर्तन घडवू इच्छिणारे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचा गाडा चालविणारे सर्व प्रमुख लोकं या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी 2047 च्या भारताचे एक व्हीजन डॉक्युमेंट, जे आपल्या सर्व टेक्नोलॉजीस्टसमोर मुख्यमंत्री मांडत जणू नियतीशी एक करार करणार आहेत. जो तुम्ही आम्ही पुढच्या 25 वर्षांत सत्य करून दाखविणार आहात, असे वाटते.
1980 नंतरच्या दशकात वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात खासगी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालये विनाअनुदान तत्त्वावर सुरू केली. याची योग्य ती संधी महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे, अशी भूमिका त्या वेळच्या विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाने घेतली होती. विद्यार्थी हा उद्याचा नसून आजचाच नागरिक आहे, हे प्रमुख्याने विद्यार्थी परिषद आग्रहाने मांडत असे. तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे विद्यार्थ्यांची बांधिलकी समाजाशी असेल, यासाठी त्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन आणि स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्याची कल्पना 1987-88 च्या सुमारास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमोर मांडली होती. त्यानुसार 1990 मध्ये ‘डिपेक्स’ सुरू झाले. 35 वर्षांचा हा प्रवास आहे. या प्रवासाने अनेक चढ-उतार पाहिले. या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अनुभवले. त्यामुळे आज सोनियाचा दिवस आहे. या सगळ्यांची दृष्टी असणारे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना यानिमित्ताने लाभलेले आहेत.
‘डिपेक्स’च्या निमित्ताने लोक आम्हाला नेहमी विचारतात की, किती पेटंट तयार झाले? किती विद्यार्थी उद्योजक तयार झाले? पण आम्ही असे सांगतो की, विद्यार्थी परीक्षा ही एक विद्यार्थी संघटना आहे. त्यामुळे यातून विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेणारे उद्योजक, उद्योजकांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे विद्यार्थी, केवळ रील बघत बसणारी आपली मुले नाही तर ती काहीतरी वेगळा विचार करतात. यामुळे सुखावणारे पालक… यातून निर्माण होणारी आपली खासगी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असा एक मोठा 360 डिग्रीमध्ये आशेचा प्रवाह उत्पन्न करणारा हा ‘डिपेक्स’ चार दशकांपासून आपल्या महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाच्या मनावर मोठा परिणाम करीत आहे.
केळी प्रक्रिया प्रकल्पांबाबत व्यक्त केली खंत
डॉ. अमळकर यांनी जळगावातील केळी प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या उदासीनतेबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, जळगावमध्ये देशाच्या केळी उत्पादनापैकी 17 टक्के केळी पिकते; पण मला तुम्हाला सांगायला दुःख वाटते की, एकही केळी प्रक्रिया उद्योग माझ्या जळगावमध्ये नाही. आमच्या जळगावमध्ये पीव्हीसी पाइप आणि चटई देशाच्या उत्पादनाच्या सहा टक्क्यांपेक्षा अधिक होते; पण तो विषय शिकवणारा एकही विषय, एकही डिग्री कोर्स आमच्या विद्यापीठामध्ये नाही. मला असे वाटते की, आज मुख्यमंत्री इथे आहेत, हे जे सगळे डिस्कनेक्शन आहे, रिसर्चमधले, टेक्नॉलॉजीमधले, तंत्रज्ञानमधले, विद्यार्थी यांच्यामधले, आपण आगामी काळात योग्य ते धोरण ठरवून सर्वांना विश्वासात घेऊन हे कनेक्शन सुदृढ कराल आणि आपल्या कल्पनेतील 2047 चा महाराष्ट्र उभा कराल. आम्ही त्यात आपल्याबरोबर आहोत, अशी ग्वाहीही डॉ. अमळकर यांनी दिली.