नरेंद्र मोदींसोबत मतभेद ! नितीन गडकरी म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चिले जाते. नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार घडत असतात. मात्र, त्यांनीच याबाबत रोखठोक मत मांडलं आहे. नितीन गडकरींनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मतभेद असल्याचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ दाखवून आमच्यात मतभेद असल्याचे दावे केले जात असल्याचंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

निवडक व्हिडीओ दाखवले जात आहेत. त्यातून आमच्यात विसंवाद असल्याचं सांगितलं जातं. अनेकांमध्ये मोदींवर थेट हल्ला करण्याची हिंमत नाही. त्यामुळे ते माझ्या बोलण्याचा गैरअर्थ लावून आपले मुद्दे मांडतात. कुणीतरी एकजण असं काहीतरी टाकतो. नंतर इतर माध्यमं त्याचा आधार घेऊन बातम्या देतात. आमच्यात कोणत्याही प्रकारचे तणाव नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.

मी कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हतो. मी आज जो काही आहे, त्याने मी समाधानी आहे. मी दृढ विश्वासाने भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी हिशोब तपासत बसणारा नेता नाही, असं मत नितीन गडकरी यांनी मांडले आहे. नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए चे सरकार अतिशय चांगले काम करत आहे. मला विश्वास आहे की, मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येणार आहोत, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

नितीन गडकरींना भाजपाकडून नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ही उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर न करता दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना त्यावरही नितीन गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आमच्याकडे संसदीय समिती महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करते आणि त्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाते. पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात या प्रदेशाच्या नेत्यांबरोबर ही पहिली चर्चा झाली. त्यामुळे तिथले उमेदवार जाहीर झाले. महाराष्ट्रात आमच्याबरोबर इतर पक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांची चर्चा करून संसदीय समितीसमोर जायला उशीर झाला. त्यामुळे माझं नाव दुसऱ्या यादीत आलं, असं नितीन गडकरी म्हणाले.

गडकरींना भाजपा सोडून आपल्यासोबत येण्याचीही ऑफर उध्दव ठाकरे यांनी दिली होती. या ऑफरवर आता नितीन गडकरींनी मिश्किल टिप्पणी केली आहे. “राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत असतात. हे चालतच राहणार आहे. ते आपण विनोदानं घ्यायला हवं. माझी भाजपाशी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाण्याचं कारण नाही. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. फक्त आमच्या विचारांत भिन्नता आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले. “त्यांनी आत्तापर्यंत नागपुरात उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे कदाचित निवडणूक बिनविरोध करण्याचं त्यांच्या मनात असू शकतं. किंवा कदाचित ते पुढे उमेदवार जाहीर करू शकतात”, अशीही टिप्पणी गडकरी यांनी केली.