रावेर : महसूल पंधरवड्यानिमीत्त गारबर्डी धरणावर आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पूर व्यवस्थापन कसे करायचे, अपघातात अडकलेल्या लोकांना कसे सोडवायचे, प्रथमोपचार कसे द्यायचे, बोट कशी चालवायची, तराफा कसा चालवायचा आदींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी बोटीद्वारे सुकी नदीत प्रत्यक्ष आपत्ती निवारणाचा अनुभव अधिकाऱ्यांनी घेतला. महसूल पंधरवड्यानिमित्त आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव पथकाच्या वतीने गारबर्डी धरणावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ, तहसीलदार बी. ए. कापसे, अप्पर तहसीलदार मयुर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, होमगार्ड अधिकारी श्री. तायडे, सहायक पोलीस निरीक्षक श्री बोचरे सहभागी झाले होते.