धुळे : शहरात मंगळवारी रात्री विजयकुमार याचा कुणी तरी अज्ञाताने खून केल्याची घटना घडली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडीस आणला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. उधारीच्या पैश्यावरून झाडाच्या फांदीने बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. राहुल अवधराम हरजन (गौतम) (वय 20 मुळ रा. गोलहौरा, महथा, सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश व ह.मु भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) असे आरोपीचं नाव आहे.
विजयकुमार झिन्नत गौतम (रा मसिजिदिया पिंपरी, सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश, ह.मु.भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) हा भंगार बाजार येथे हमाली करीत होता. त्याचा दि.1 रोजी रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने हत्याराने वार करुन खुन केला. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपा शेजारील सार्वजनिक शौचालयाच्या मागे त्याचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबाबत मयताचा शालक बुध्दराम बिपत गौतम यांच्या तक्रारीवरुन धुळे शहर पोलिसात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरु असताना हा गुन्हा राहुल अवधराम हरजन (गौतम) (रा. भंगार बाजार, धुळे) याने केला असून तो कळंबोली, पनवेल येथे पळुन गेलेला असल्याची गोपनिय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकाला कळंबोली, पनवेल येथे रवाना केले. पथक दि. 3 रोजी त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव राहुल अवधराम हरजन (गौतम) (वय 20 मुळ रा. गोलहौरा, महथा, सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश व ह.मु भंगार बाजार, चाळीसगाव रोड, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.