जि.प.चा 121 कोटींचा निधी अजूनही अखर्चित

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सन 2021-22 मधील मंजूर निधीपैकी 121 कोटींचा निधी अद्यापही अखर्चित आहे. ग्रामपंचायत विभागातील जनसुविधेचा 33 कोटी 15 लाख तर सिंचन विभागाच्या कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आणि पाझर तलावासाठीचे एकूण 31 कोटी रुपयांचा निधी पडून आहे. या निधीच्या खर्चाला आता फक्त चार महिन्याची मुदत असल्याने जिल्हा परिषदेला निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

जिल्हा परिषदेचा निधी खर्च होत नसल्याने जिल्हा नियोजन समितीत वारंवार याविषयावर चर्चा होते. मात्र जिल्हा परिषदेत कामे वाटपातील होणार्‍या अडचणीमुळे हा निधी पडून राहिल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने रस्ते दुरूस्तीसाठी 18 कोटी, अंगणवाडी 20 कोटी, इतर रस्ते 8 कोटी आदी हेडवरील निधी खर्च होत नसल्याचे दिसून येते. सन 2021-22 च्या निधी खर्चास मार्च 2023 पर्यंत मुदत असल्याने जि.प.तील विविध विभागाला निधी खर्च करण्याचे आव्हान कायम आहे. निधी खर्च करण्याचे शिवधनुष्य चार महिन्यात पेलण्यासाठी जि.प.प्रशासकांची कसोटी लागणार आहे. शिफारशीसाठीचे स्थानिक आमदारांचे हेवेदावे आणि माजी जि.प.सदस्य यांच्यात सध्या कामावरून रस्सीखेच सुरू आहे. आपल्याच कार्यकर्त्यांला काम मिळावे यासाठी आमदारासह जि.प.सदस्यांचाही खटाटोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.