नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील बारा हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन प्रमाणे २४ हजार गाईंचे वाटप सुरू केले असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. ते दंडपाणेश्वर मंदिर येथे आयोजित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या संयुक्त दायीत्व गटांच्या पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायींच्या लाभार्थ्यांच्या आढावा बैठक, खरेदीपूर्व प्रशिक्षण व शेळी गट वितरण कार्यक्रमात बोलत होते.
मंत्री डॉ. विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, मागील पंचवीस वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना पोहोचवल्या आहेत. राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी झाली नसेल एवढ्या योजना एकट्या नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या आहेत. या योजनांतर्गत जिल्ह्यातील नंदुरबार तालुका ५०००, नवापूर तालुका २०००, अक्कलकुवा तालुका १५००, धडगाव १५००, शाहदा १५०० व तळोदा ५०० टालुक्यातील लाभार्थी या प्रमाणे एकूण १२००० लाभार्थी व २४००० गायींचे वितरण केले जाणार आहे. मेळाव्यामध्ये प्रामुख्याने ज्या लाभार्थीचे गायी वाटप पूर्ण झाले आहे अशा लाभार्थीचे महाराष्ट्र शासनाकडून प्रती लीटर ५ रुपये प्रमाणे देय असलेले दुधाचे अनुदान अर्ज भरून घेणे व कागदपत्रांची पूर्तता तसेच नव्याने गायी खरेदीसाठी जाणाऱ्या लाभार्थीचे गायी खरेदी पूर्व प्रशिक्षण – पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचे कडून घेण्यात येणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुप्रिया गावित यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जाेडधंदा असणाऱ्या पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहीत केले. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले.
मागेल त्याला योजनेचा लाभ
यावेळी मंत्री गावित म्हणाले, जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजतागायत शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यातील जनतेच्या हिताच्या आहेत त्या राबविण्यासाठी शासन दरबारी आग्रही राहिलो आहे. अपवादात्मक एखादा पात्र लाभार्थ्यी वगळता मागेल त्याला योजनेचा लाभ दिला आहे.