धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे त्वरित पंचनामे करा, जिल्हा प्रशासनाचे निर्देश; आमदार भदाणे यांचा पाठपुरावा

by team

---Advertisement---

 

धुळे : तालुक्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे होऊन प्रस्ताव मागविण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे उपविभागीय अधिकारी, धुळे ग्रामीणचे तहसीलदार, अपर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांच्या स्वाक्षरीच्या आदेशात म्हटले आहे की, मदत व पुनवर्सनमंत्री मकरंद पाटील यांनी आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या ३ ऑक्टोबरच्या पत्रावर शेरांकित केलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्यानुसार धुळे ग्रामीण मतदारसंघात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे तालुक्यात काही मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तेथे अतिवृष्टीचे पंचनामे करण्यात आले; परंतु तालुक्यातील उर्वरित मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची पाहणी आमदार भदाणे यांनी स्वतः केली आहे. अशा नुकसानग्रस्त मंडळांतही पंचनामे होणे अपेक्षित आहे. तरी धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील पंचनामे होऊन प्रस्ताव मागविण्यासाठी संबंधितांना निर्देशित करावे, असे संदर्भिय पत्रान्वये नमूद केले आहे.

सप्टेंबरमध्ये धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान आलेल्या (६५ मिलिमीटरपेक्षा जास्त) क्षेत्राचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीचा निधी मागणी प्रस्ताव सादर करावा, तसेच ज्या मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला असेल. मात्र, प्रत्यक्ष शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून महसूल व वनविभागाकडील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र विशेष म्हणून निधी मागणीचा प्रस्ताव सादर करावा, असा संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे लेखी आदेश काढल्याने व तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार भदाणे यांच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---