‘मनरेगा’चे सव्वा लाखाहून अधिक मजूर ई-केवायसीविना! जोडणी करा, अन्यथा जिल्हा प्रशासन जॉबकार्ड रद्द करण्याच्या तयारीत

---Advertisement---

 

शिरपूर : राज्यात शासनस्तरावरून ‘मनरेगा’ तर्गत पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक नोंदणीकृत जॉबकार्डधारकास ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. असे असले तरी धुळे जिल्ह्यात मात्र अद्याप एक लाख २७ हजार ७२९ जॉबकार्डधारकांचे ई-केवायसी जोडणी प्रलंबित आहे. ज्या मजुरांची ई-केवायसी जोडणी झाली नाही, त्यांचे जॉबकार्ड रद्द होऊ शकते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात ‘मनरेगा’ तर्गत विविध ठिकाणी कामे केली जात आहेत. आगामी काळात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे यासाठी शेल्फवर अद्याप बरीच कामे प्रस्तावित आहेत. त्यानुसार बरीच कामे ग्रामपंचायत स्तरावर आगामी काळात सुरू केली जाणार आहेत.

राज्य शासनस्तरावरून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी २००३ पासून केली जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागात ‘रोजगार हमी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही’ अशीच काहीशी अंमलबजावणी केली जात होती; परंतु या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने आता ‘मनरेगा’च्या सर्व मजुरांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. यात ई-केवायसी प्रक्रियेत जॉबकार्ड क्रमांक टाकून मजुरांचे फेस स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे ‘मनरेगा’ मार्फत होणाऱ्या प्रत्येक कामात पारदर्शकता येणार आहे.

धुळे जिल्ह्यात दोन लाख ३४ हजार ५६५ मजुरांची नोंदणी आहे. यात एक लाख सहा हजार ८३६ मजुरांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. असे असले तरी अद्याप एक लाख २७ हजार ७२९ जॉबकार्डधारकांची ई-केवायसी जोडणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या मजूर ई-केवायसी करणार नाहीत, त्यांचे जॉबकार्ड बंद होऊ शकते, असेही जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे.

गावातील मजुरांना सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना: ज्यामध्ये सिंचन विहीर, पाणंद रस्ते, जनावरांचे गोठे, घरकुल आदी शेकडो प्रकारच्या कामांत जॉबकार्डधारक मजूर काम करून उदरनिर्वाह चालवीत आहेत. गावातील मजुरांना जॉबकार्ड काढून देण्यासह मजुरी देयके संकेतस्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, रोजगार सेवकांची आहे.

शासननिर्देशानुसार प्रत्येक मजुराचे ई-केवायसीनंतर ‘मनरेगा’तर्गत कोणत्याही शासकीय कामावर तो मजूर उपस्थित असेल, तर त्याबाबत मजुराचे चेहरा प्रमाणीकरण करण्यात येणार असून, तो कामावर उपस्थित असल्याचा फोटो पोर्टलवर नोंदविला जाणार आहे. त्यामुळे कामकाज अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

  • शासननिर्देशानुसार रोजगार हमी मजुरांची ई-केवायसी अनिवार्य आहे. शिरपूर तालुक्यात सर्व ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांची संयुक्त आढावा बैठक घेत ई-केवायसी प्रक्रिया प्राधान्याने करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक जलद काम होण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यासंदर्भात लक्ष देत आहेत. लवकरच तालुक्यातील मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास येईल.
    प्रदीप पवार (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरपूर)
  • ‘मनरेगा’ तर्गत नोंदणी असलेल्या सर्व मजुरांची ई-केवायसी करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामरोजगार सेवक हे प्रत्येक मजुराच्या घरी जाऊन नोंदणीकृत मजुरांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. मजुरांची ई-केवायसी नोंदणी शंभर टक्के पूर्ण केली जाईल.
    देविदास धाडे (ग्रामपंचायत अधिकारी, तन्हाडी)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---