जिल्हा बँकेचा वचपा भाजप युतीने दूध संघात काढला

तरुण भारत लाईव्ह न्यूज : जिल्ह्यासह राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर 2019 मध्ये पार पडली. यात भाजपा शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली. राज्यात ऐनवेळी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करीत महाविकास आघाडीत सामील होऊन सत्ता स्थापन केली. दरम्यान, भाजपामध्ये असताना डावलले जात असल्यामुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचे पडसाद उमटून जिल्ह्याचे राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदलले आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासकृत खडसे गटाने त्यांचे प्राबल्य कायम ठेवले आणि हेच जिल्हा बँकेच्या प्राबल्याचे शल्य आज जिल्हा दूध संघ संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाजन गटाने दूर करीत 15 विजयी उमेदवारांच्या माध्यमातून जिल्हा बँक ते दूध संघ महत्वाचा टप्पा काबीज केला.
जिल्हा बँकेचे शल्य

दोन अडीच वर्षात कोरोना संसर्गामुळे स्थगीत वा लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य निवडणुकांपैकी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायती नंतर गेल्या वर्षी 2021 मध्ये जिल्हा बँक आणि विकासो अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडल्या. यात डिसेंबर 2021 अखेरीस जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली. यावेळी जिल्हा बँकेत सत्तेवर असलेल्या भाजपा गटाला सोबत न घेता महाविकास आघाडीने शेवटपर्यंत सर्वपक्षीय आघाडीचे गाजर दाखवत एका दृष्टीने निवडणुकीपासून लांबच ठेवले. शेवटी भाजपाच्या सर्व उमेदवारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत वॉकआऊट केल्याने महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता मिळविली.
पोलीस तक्रार घेईनात! म्हणून आंदोलन

जिल्हा दूध संघाच्या प्रशासक काळातील दूध आणि दूग्धजन्य पदाथार्ंची चोरी, गैरव्यवहार प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे आणि त्यांचे संचालक मंडळ तसेच समर्थक आक्रमक होऊन शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. परंतु पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अखेर आमदार खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी रात्रभर शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. तर दुसरीकडे प्रशासक मंडळाने जिल्हा दूध संघातील दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा अपहार प्रकरणी दूध संघ व्यवस्थापक आणि अध्यक्ष, संचालक मंडळाविरूद्ध तक्रार दाखल केली. याचे पडसाद जिल्हाभरात उमटले.

खडसे विरूद्ध महाजन गटात आरोप आव्हानांच्या फैरी

एकीकडे जिल्हा दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि दुसरीकडे आमदार खडसे विरूद्ध मंत्री महाजन, आमदार मंगेश चव्हाण तर कधी आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गुलाबराव पाटील असा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत सामना दिवसेंदिवस रंग भरू लागला.

तटस्थपणामुळे झाली निवडणूक

जिल्ह्यात खडसे- महाजन चव्हाण गटाचे पडसाद जिल्हा दूध संघ निवडणुकीत शेवटपर्यत दिसून आले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या एका गटाचे नेते सर्वपक्षीय पॅनल करण्यासाठी इच्छुक होते. परंतु दुसरा गट अटी शर्ती न ठेवता सर्वपक्षीय पॅनल बनविण्यात यावे यावर ठाम होता. अखेर सर्वपक्षीय आघाडी दूरच राहीली. जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या माघारी अंती महाजन, चव्हाण आणि शिंदे गट विरूद्ध खडसे गट अशीच लढत जिल्हा दूध संघात पहावयास मिळाली.

जिल्हा दूध संघात अपहार चोरीची तक्रार पोलीस ठाण्यापर्यत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची खदखद गेल्या सहा महिन्यापासून होती. राज्यात जूनअखेरीस विधान परिषद निवडणुकीत आमदार खडसे निवडून आले. परंतु लगेचच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. दरम्यान ऑगस्ट महिन्यात जिल्हा दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले. त्यात बेकायदेशीरपणे प्रशासक नियुक्ती झाली म्हणून संचालक मंडळाने न्यायालयाव्दारे प्रशासक हटविण्यात येवून पुन्हा संचालक मंडळाकडे कारभार हस्तांतरीत करण्यात यश मिळवले. आणि या दरम्यानच्या काळात दूध संघात झालेला दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा अपहार, चोरी, गैरव्यवहार आदी सर्व आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने जगजाहीर झाले.