Jalgaon News: जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान, वाचा सविस्तर

गेल्या वर्षापासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकारी सहभाग घेत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेला अजून सहा महिने अवकाश असताना विद्यार्थ्यांचे कोणते नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात यावर्षी कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी होणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकार्‍यांनी येथे केले. सावदा येथे शनिवारी मतदार पडताळणी अभियानाला आले असता पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल नायब तहसीलदार संतोष विनंते, सावदा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पडे, सावदा मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे उपस्थित होते

गुणवत्तेनुसारच मिळवावे यश
विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना गुण मिळावे. यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाला लागावे . शिक्षकांनीही विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करावे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे ज्यादा तास क्लास घ्यावेत कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. दहावी-बारावीच्या परीक्षेत कुठलीही कॉपी होऊ नये यासाठी आपण दक्षता घेणार आहोत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, फैजपूर उपविभागातील सर्व संस्थाचालक विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी यांचे कॉपीमुक्त अभियान संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी फैजपूर उपविभागातील प्रत्येक शाळेला स्वतः भेट दिली जाईल तसेच शाळांमध्ये घडणार्‍या अनुचित प्रकाराला आळा घालण्यात येणार आहे.

पुण्यात केले होते गुन्हे दाखल
पपुणे जिल्हा परीरषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बारावीच्या परीक्षा दरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणात आयुष प्रसाद यांनी नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल केले त्यामुळे जिल्हाधिकारी कॉपीमुक्त अभियानाबाबत आत्तापासूनच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत.