तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि अत्यंत चुरशीची ठरलेल्या जिल्हा दूध संघाची निवडणूक भाजप आणि शिंदे गटाने जिंकली. यात गेल्या सात वर्षांपासून दूध संघावर एकछत्री अंमल असलेल्या खडसेंना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देत बहुमताने निवडून आलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांची दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान आणि ११ रोजी झालेल्या मतमोजणीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी पॅनलला बहुमत मिळाले. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड रविवार, १८ डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी शनिवार, १७ रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी संचालक आमदार चिमणराव पाटील यांच्या होणार्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील दोन्ही मंत्री अध्यक्षपदाबाबत इच्छुक नाहीत. त्यांच्याऐवजी आमदार एकनाथराव खडसेंना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देत बहुमताने निवडून आलेल्या मंगेश चव्हाण यांचेच नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा दूध संघाचा कार्यकाल २०२० मध्येच संपुष्टात आला होता. परंतु कोरोना संसर्गामुळे संचालक मंडळाला तत्कालिन महाविकास आघाडी सरकारकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. परंतु जूनअखेरीस राज्यात सत्तांतर होऊन काही काळ का होईना ऑगस्ट महिन्यात जिल्हा दूध संघांवर प्रशासक नेमण्यात आले. नेमक्या याच काळात जिल्हा दूध संघातील दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा अपहार, संशयास्पद व्यवहार, व्यवहारांमधील अनियमिततेबाबत प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी आवाज उठवत झालेला भ्रष्टाचारच बाहेर काढला.
निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
दूध संघातील चव्हाट्यावर आलेला भ्रष्टाचार आणि त्यानंतर जाहीर झालेल्या निवडणुकीत आमदार खडसेंना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देत आमदार चव्हाण बहुमताने जिंकून आले.
आमदार चव्हाण यांच्या आक्रमक शैलीचा फायदा जिल्हा दूध संघ निवडणुकीत तर झालाच, शिवाय आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्येदेखील होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेवर गेल्या दोन पंचवार्षिकीपासून भाजपची सत्ता होती. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांची मुदत अनुक्रमे मार्च आणि एप्रिल २०२२ दरम्यान संपुष्टात आल्यामुळे त्यावर प्रशासक आहेत. राज्यातील तसेच जिल्हा दूध संघांच्या बदलत्या राजकारणाचा परिणाम आगामी काळात दिसून येण्याची चिन्हे आहेत.