जळगाव- जिल्ह्यात गौण खनिज तसेच अन्य वस्तूंची वाहतूक मंजूर भारक्षमतेपेक्षा अधिक भार वाहतूक अवजड वाहनांव्दारे केली जात आहे. ओव्हलोड वाहतुकीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागासह स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याचा प्रत्यय रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारात ओव्हरलोड ट्रकक्रमांक MH.18 M-2939 अडकल्याने काही वेळ वाहतूकीचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात नदी-नाले परिसरात वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. तसेच सायंकाळनंतर गौण खजिन वाहतूक करू नये,असे शासननिर्देश असले तरी असूनही बिनधास्तपणे ट्रॅक्टर, ट्रक, डंपर आदी वाहनांव्दारे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून की काय, अन्य वस्तूंची देखील ट्रकव्दारे बिनदिक्कतपणे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे.
रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास एका व्यापार्याने खरेदी केलेला शेतमाल भरलेला ट्रक क्रमांक MH.18 M-2939 ओव्हरलोड आणि अधिक उंचीमुळे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशव्दारात अडकला. रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये वाहनांची फारशी वर्दळ नसली तरी प्रवेशव्दारातच ट्रक अडकल्याने रस्त्यावरून जाणार्या अन्य वाहतूकीला काही वेळा अडळा निर्माण झाला.
नियम फक्त सर्वसामान्यांनाच, व्यापारी वाहनांना नाही
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेजारच्या धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरीही शेतमाल विक्रीसाठी आणतात. तसेच सर्वसामान्य नोकरदार खाजगी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली जाते. या आवक-जावक नोंदीसहीत बाहेर जाणार्या मालाची गेट पासची कसून चौकशी बाजार समितीच्या प्रवेशव्दारावर होते. गेटपास नसल्यास नागरिकांनी खरेदी केलेले अन्नधान्य बाहेर जाऊ शकत नाही.
दरम्यान, अवजड वाहतूक करणारा प्रवेशव्दारात अडकलेल्या ट्रक संदर्भात बाजार समितीच्या सचिव बोरूडे यांच्याकडे संपर्क साधला असता, अधिक लांबीमुळे ट्रकचा टर्न बसू शकत नाही. त्यामुळे बरेचवेळा ट्रक अडकतात असे सांगीतले. तसेच अडकलेल्या ट्रक क्रमांकाविषयी चौकशी केली असता माहीत नसल्याचे गेटकिपरने सांगीतले. यावरून नियम फक्त सर्वसामान्यांनाच असून व्यापार्यांच्या वाहनांना हे लागू नसल्याचे दिसून येत आहे.