तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने मिनी मंत्रालयातील कामांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या कामांना आचारसंहितेचा अडसर निर्माण झाल्याने या कामांची वर्कऑर्डर प्रक्रियाही थांबली आहे. जि.प.च्या सिंचन विभागाचा सर्वाधिक १५ कोटींच्या कामांच्या वर्कऑर्डरला ब्रेक लागल्याने ही कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे जि.प.प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचा सुमारे १५ कोटी तर महिला व बालकल्याण विभागाचा २ कोटी आणि आरोग्य विभागाच्या ३ कोटींच्या कामांना आचारसंहिता आडवी आल्याने ही कामे रखडली आहेत. त्यामुळे या कामांच्या वर्कऑर्डर आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहेत. कारण आचारसंहितेत या कामांच्या वर्कऑर्डर प्रशासकीयदृष्ट्या देता येणार नाहीत. त्यातच सिंचन विभागाला कामे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सिंचन विभागाकडे आचारसंहिता संपल्यानंतर बंधार्यांची कामे करण्यासाठी अवघा तीनच महिन्याचा कालावधी उरणार आहे. कारण पावसाळ्यात सिंचन विभागाला बंधार्यांची कामे करता येणार नाहीत. त्यासाठी तीनच महिन्यातच सिंचन विभागाला बंधार्याची कामे करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. सिंचन विभागाच्या ३९ कामांना सध्या ब्रेक लागला आहे. तसेच आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी बांधकामांची कामेही आचारसंहितेमुळे रखडली आहेत.कमी कालावधी मिळाला तरी आचारसंहिता संपताच कामांना वेग दिला जाईल असेही जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी तरूण भारतशी बोलतांना सांगितले.