जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर नोकर पतपेेढी भूखंड खरेदीत सव्वादोन कोटींचा अपहार

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या नागरी सहकारी पतपेेढीत अध्यक्ष व संचालक मंडळाने भूखंड खरेदीत २ कोटी २४ लाखांचा अपहार केल्याचा आरोप पतपेढीचे सभासद विनोद महेश्री यांनी ३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत केला. ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील यांच्या निवासस्थानी ही पत्रपरिषद झाली.
यावेळी लोकसहकार गटाचे अध्यक्ष मनोज पाटील, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील उपस्थित होते.

विनोद महेश्री म्हणाले की, पतपेढीचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी मुख्य इमारत मोडकळीस दाखवून सहकार खात्यांच्या अधिकार्‍यांची दिशाभूल करून खोटे प्रस्ताव दाखल करून नवीन इमारत जागा खरेदी करण्यात आली. ७ डिसेंबर २०१७ रोजी मूळ मालक विजया दत्तात्रय पाटील, जळगाव यांच्या मालकीचा जळगाव सि.स.नं. प्लॉट नं.६ असताना विभागीय सहनिबंधक सहकारी नाशिक यांच्याकडे पतपेढी प्लॉट घेणार असा प्रस्ताव २३ ऑक्टोबर २०१७ रोजी सादर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात अबोली कस्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत चौधरी, जळगाव यांना हाताशी धरून हा प्लॉट त्यांच्याकडून ४ लाख २१ लाख ८१ हजार एवढ्या रकमेला खरेदी करण्यात आला. हाच प्लॉट विजया दत्तात्रय पाटील यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी १ कोटी ९७ लाख एवढ्या रकमेत अबोल कन्स्ट्रक्शन यांना विक्री करण्यात आला. ६ डिसेंबर २०१७ रोजी पतसंस्थेच्या निधीमधून धनादेशाने २ कोटी ५० लाख रुपये मालक नसताना संबंधित प्लॉटबाबत ऍडव्हान्स देऊन बनावट सौदेपावती करण्यात आली. तसेच १९ डिसेंबर २०१७ रोजी १ कोटी ७१ लाख ८१ हजार एवढी रक्कम पुन्हा धनादेशाने देण्यात आली असून, मूळ मालक व दलाल यांच्यात झालेल्या व्यवहारात २ कोटी २४ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, रावसाहेब पाटील यांनीही पुरावे सादर करीत पतपेढीतील प्लॉट खरेदीसह भरतीतही घोटाळा झाल्याचा दावा केला. कोरोना काळात पतपेढीत भरती झाली कशी? यावर विनोद महेश्री यांनी आक्षेप घेतला.

पत्रकार परिषदेला ग.स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, रावसाहेब मांगो पाटील, सभासद विनोद महेश्री, सुरेश कोल्हे, डॉ.शांताराम पाटील, नरेंद्र सपकाळे, रवींद्र पाटील, गोविंदा पाटील, संदीप पाटील, ए.टी.पवार, संदीप तायडे, दीपक सूर्यवंशी, नाना पाटील, दीपक गिरासे, पारोळा सोसायटी चेअरमन सचिन वाघ, सचिन पाटील, भागवत हाडपे, अनिल गायकवाड आदी उपस्थित
होते.

पतपेढीची इमारत खरेदी, नवीन बांधकाम, जुनी इमारत दुरूस्ती, फर्निचर व नोकर भरती यात झालेल्या अपहाराबाबत दिलीप महेश्री यांनी सहकार खात्यांकडे तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्याबाबतची सुनावणी जिल्हा उपनिबंधक जळगाव यांच्याकडे १८ जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या अपहाराची चौकशी होऊन संबंधित संचालक मंडळ व अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेेढीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.