जळगाव : गणेशोत्सव, दुर्गोेत्सव आटोपला की दिवाळीची चाहुल लागते. गेल्या दोन दिवसांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सर्वत्र प्रचंड उलाढाल वाढल्याचे दिसून येत आहे. बाजारात आकर्षक पणत्या, आकाशकंदिल लक्षवेधी ठरत आहे.
दिवाळी म्हणजे आनंद व उत्साहाला उधाण. सणांचा राजा म्हणजे दिवाळी. या उत्साहाचे प्रतिबिंब गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरातील बाजारपेठेत दिसत आहे. विविध खरेदीसाठी ग्राहकराजा मोठ्या उत्साहाने बाहेर पडत असल्याचे दिसत असल्याने रस्ते ‘पॅक’ होत असल्याचेच लक्षात येते.
कापड मार्केटमध्ये गर्दी
टॉवर चौक परिसरातील आयते कपडे व साडी, महिलांचे ड्रेस, लहान, लहान मुलांचे कपडे खरेदीसाठी झुंबड उडत आहे. बर्याच दुकानांमध्ये 10 ते 20 टक्के कपड्यांची किंमत वाढली असल्याचे लक्षात येते. मात्र गर्दीत कोणतीही कमतरता नसल्याचे बाजारातील गर्दीवरून लक्षात येते. यासह टॉवर चौक ते शिवाजी नगरकडे जाणार्या मार्गावर केळकर मार्केट, संत बाबा गेलाराम मार्केट व अन्य दुकाने आहेत. तेथेही पाय ठेवायला जागा नसल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा लागली दुकाने
रस्त्याच्या दुतर्फा काही आकाशकंदिल, आकर्षक पणत्या विक्रेते बसले आहेत. यासह लक्ष्मी पूजनासाठी लागणारी लक्ष्मीची मूर्ती, केरसुनी, व्यावसायिकांसाठी लागणार्या हिशोबाच्या वह्या विक्रीची दुकाने लक्ष वेधून घेत आहेत.
फटाके विक्रीला सुरूवात
दिवाळी म्हटली म्हणजे फटाके आलेच. कोर्ट चौक परिसरातील जी.एस. मैदानाच्या जागेत फटाके विक्रीचे असंख्य स्टॉल लागल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी पालकवर्ग बालगोपालांना बरोबर घेऊन फटाके खरेदीस येत असल्याचेही दिसून येते.
सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 वाजेनंतर बाजारपेठेत प्रचंड गर्दीचे दृश्य आता दिसत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.