पुणे: राज्यात सध्या अनेक गावांमध्ये धर्मांतराच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. मात्र यातील अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहचत नाही. येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचा रस देत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे आपल्याला आठवत असेल. बंजारा समाजातही ख्रिस्ती धर्मप्रचारकांविषयी राग व्यक्त होत आहे. आता पुन्हा एकदा आळंदी येथे धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे. मरकळ गावात काही व्यक्ती लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचतात का? चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला व्यवसायाला आर्थिक मदत करू, असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा व धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांत १४ जणांवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलाचा देखील समावेश!
यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. येथील एका सलून व्यावसायिकाने या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १५ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. आर्थिक अमिष दाखवून चौदा जणांकडून धर्मांतराचा प्रकार सुरु होता, असे तक्रारीत म्हटले आहे. त्या अनुषंगाने आळंदी पोलीस ठाण्याचे हवालदार लोणकर अधिक तपास करीत आहेत.