डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाने  पहूरच्या कन्येला मिळाले जीवदान

तरुण भारत लाईव्ह न्यूज ; पहूर, : डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे पहूर येथील विवाहित कन्येला जीवनदान मिळाले आहे. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पहूरपेठ येथील लेकीचं गावकर्‍यांनी सवाद्य मिरवणूक काढून ढोलताशांच्या गजरात स्वागत केले.

पहूरपेठ येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते कडूबा ठमाजी पाटील यांची नात, ग्रामपंचायत सदस्या मीना शरद पाटील यांची 22 वर्षीय विवाहित मुलगी व पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश थोरात यांची पत्नी अश्विनी योगेश पाटील (रा. पिंपळगाव बुद्रूक ) या गर्भवती असताना डबल न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता अश्विनीच्या गर्भात 7 महिन्यांचे 2 भ्रृण (जुळे) मृत्युमुखी पडल्याचे निष्पन्न झाल्याने डॉक्टरांच्या पायाखालची वाळूच सरकली. परंतु दैव बलवत्तर म्हणून की काय? डॉ.शरद देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले. अडीच ते तीन महिने मृत्यूशी झुंज देत आजारातून बरे होऊन आज त्यांचे माहेरी पहूरपेठ नगरीत आगमन झाले. मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या लेकीचे स्वागत करण्यासाठी गावकरी ढोलताशांचा गजर करत आतुरतेने वाट पाहत होते

.
यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील, आर.टी. लेले हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.बी. पाटील, किरण पाटील, किशोर पाटील, शरद पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.