---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या तब्येतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पवार यांना किरकोळ छातीचा संसर्ग झाला होता. आवश्यक तपासण्या आणि औषधोपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस त्यांनी पुण्यातच विश्रांती घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी स्पष्ट केले की, इतर सर्व वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य आले आहेत आणि सध्या काळजी करण्यासारखे काहीही नाही. घरी गेल्यानंतरही त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे.
पवार यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी माहिती दिली होती. त्यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत सांगितले होते की, त्यांच्या वडिलांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. मात्र इतर सर्व शारीरिक तपासण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत, असेही त्यांनी नमूद केले होते. शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले होते.
गेल्या काही दिवसांपासून पवार यांची तब्येत ठीक नसल्याची चर्चा होती. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना ताप, खोकला आणि कफाचा त्रास वाढल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आता त्यांची प्रकृती सुधारली असून शनिवारी त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.









