कोलकाताच्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप ; मोर्चा काढत केली घोषणाबाजी

जळगाव  : कोलकाता येथे येथील आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील गुन्हेगारी घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी शनिवारी दि. १७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासुन डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र निवासी विद्यार्थी संघटनांतर्फे (मार्ड) मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना व शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.  कोलकाता येथील आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील गुन्हेगारी घटनेबद्दल आमचे तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त करीत आहोत.

आर.जी. मधील द्वितीय वर्षाच्या पीजी रहिवाशावर हल्ला, बलात्कार आणि खून झाल्याची गंभीर घटना तसेच, मेडिकल कॉलेजवर गुंडांचा हल्ला याबाबत आज कृती कार्यक्रम आम्ही करीत आहोत. त्यात ओपीडी, शस्त्रक्रियागृह, कक्ष कर्तव्य, प्रयोगशाळा कर्तव्य तसेच शैक्षणिक कामकाज बेमुदत बंद राहील. मात्र आपत्कालीन सेवा ह्या नेहमीप्रमाणे सुरु राहतील, असे निवेदनात म्हटले आहे.

मोर्चात मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. भावेंश खडके, उपाध्यक्ष डॉ. अमृता कागदवार, सचिव डॉ. दीपक कव्हर यांच्यासह ३०० ते ४०० कनिष्ठ डॉक्टर्ससह आंतरवासिता विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून घटनेचा निषेध करीत आंदोलनाला सुरुवात केली होती. आंदोलन हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

 

प्रमुख मागण्या 

केंद्रीय प्राधिकरणाकडून या गुन्ह्याचा तात्काळ निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा.  आंदोलन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांवर पोलीस अत्याचार करू नका. सेंट्रल हेल्थकेअरच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना व्हावी. संपूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही आणि सुसज्ज रक्षकांसह सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे,आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्तम सुरक्षा राखावी.  निवासी डॉक्टरांना दर्जेदार वसतिगृहे तसेच कॉल रूम्स उपलब्ध करून देणे.