डॉक्टरांना हवा लोकाश्रय!

आपल्यावर आलेले विघ्न दूर करणारे चालते-बोलते ईश्वर म्हणजे डॉक्टर. Doctor डॉक्टर म्हणजे पृथ्वीतलावरील देवदूत असाच सर्वसामान्यांचा विश्वास आहे. मात्र, हीच डॉक्टर मंडळी समाजातील वाईट प्रवृत्तींमुळे चिंताग्रस्त आहेत. त्यांना अशा अवस्थेत लोकाश्रय न मिळाल्याने निराश आहेत. म्हणूनच त्यांना लोकाश्रय मिळावा, असा विचार पुढे आला आहे. कारण डॉक्टर समाजातील लोकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अहोरात्र झटतात. त्यांना लोकाश्रय मिळणे अपेक्षितच आहे.

प्रत्यक्षात सूक्ष्म अभ्यास करता समाजात ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ हा प्रकार वाढलेला आहे. पूर्वी हीच Doctor डॉक्टर मंडळी अनेक कुटुंबांचा आधारस्तंभ होती. तेव्हा फॅमिली डॉक्टर राहायचे. कुटुंबातील प्रत्येकाशी त्यांचा संवाद व्हायचा. आज फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच नसल्याने सर्वच भरकटल्यासारखे करीत असतात. यामुळे व्यथा वाढते अन् त्याचा राग कुठेतरी निघतो. पण प्रश्न हा पडतो की, रुग्णाच्या नातेवाईकांनीही प्रत्यक्ष देवदूतावर हात का म्हणून उगारावा, कशाला वाद घालावा? जे काही असेल ते पूर्वीच व्यवस्थित बोलावे. पण तेही चुकीचे वागतात. पैसे देण्याची वेळ आल्यावर भांडतात. शिवाय डॉक्टरांनीही झेपेल एवढेच साम्राज्य वाढवावे. पण तेही मजबुरी असो की लोभ साम्राज्य वाढवून मोकळे होतात. प्रत्यक्ष सेवा देण्याची वेळ आली की, त्यांच्याकडे तेवढा पुरेसा कालावधीच उरत नाही. अशावेळी चुकीच्या माणसांच्या हाती कारभार सोपविला जातो. त्यांच्या चुकांचे खापर डॉक्टरांवर फुटते. अशी अनेक उदाहरणे घडलेली आहेत. याही कारणामुळे डॉक्टर लोकाश्रयापासून वंचित आहेत.
जन्म झाला तर मृत्यू अटळ आहे. तरीही काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू वाढलेले आहेत. या कारणामुळे कुणाचीही प्रगती होवो तिथे मत्सर सुरू होतो. कुणाला पुरस्कार मिळाला की दुसर्‍याच क्षणी तिरस्कार सुरू होतो. हीच लोकभावना डॉक्टरांच्या संदर्भातही लागू पडलेली आहे. आपण जो काही पैसा मोजला तो सर्वच डॉक्टरांना मिळतो, असाही गैरसमज करीत कित्येक जण संताप व्यक्त करतात. पण ते चुकीचे आहे. डॉक्टरांनाही कर्मचार्‍यांचे पगार करावे लागतात. प्रशासकीय शुल्क भरावे लागते. देखभाल करण्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो.

त्याचाही विचार करायला हवा. समाजाचे चुकते, तेव्हाच डॉक्टरही अनेकदा चुकतात ना? समजा डॉक्टर चुकले नाही तर त्यांच्याकडील कर्मचारी चुका करतात. रुग्णांच्या नातेवाईकांशी प्रेमाने, आस्थेने आणि आपुलकीने बोलण्याचे सोडून ते अरेरावीची भाषा वापरतात. दरम्यान, शासनाचे कडक नियम, प्रशासनातील वाढत असलेली ‘तोडपाण्याची’ प्रवृत्तीही Doctor डॉक्टरांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. आयुष्यमान भारत योजना आपल्या रुग्णालयाशी संलग्न करायची झाल्यास डॉक्टरांनाही तोडपाणी करावे लागते. आज सर्वत्र ‘बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या’ हे समीकरण उदयास आले आहे. यावर कुणीही उपाय करायला तयार नाही. परिणामी त्याचे खापर डॉक्टरांवर फोडून सर्वजण मोकळे होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार रुग्णाला 45 मिनिटे तपासणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात ते शक्य नाही.
याशिवाय फार्मा कंपन्यांचे चक्रव्यूह, दलालांचे रॅकेट, साम्राज्य विस्ताराची वृत्ती डॉक्टरांना धोकादायक ठरत आहे. माणसाच्या हाती 24 तास असतात. त्यापैकी 7 तास झोप आवश्यक असते. पण अनेकांनी झोप सोडून कामावर लक्ष केंद्रित केलेले आहे. यामुळे त्यांच्यात चिडचिडपणा वाढलेला आहे. परिणामी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकांवर संताप व्यक्त करणे, हात उगारणे या गोष्टी वाढलेल्या आहेत.

वस्तुत: हात उगारण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असतात, याचेही भान समाजातील सुज्ञांना राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती आहे. चीन निर्मित कोरोना विषाणूच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी ढाल बनून डॉक्टरच समोर आले होते. अशा सर्वच डॉक्टरांना प्रणामच केला पाहिजे. डॉक्टरांनी तेव्हा धाडसाने काम केले म्हणूनच अनेकांचा जीव वाचला. आज ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा याच समर्पित व सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या डॉक्टरांवर अवलंबून आहे. ग्रामीण व अतिदुर्गम भागातही वैद्यकीय सेवा देणारे अनेक डॉक्टर्स आहेत. समाजाने अशा डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला हवे. सीमेवर लढणारा सैनिक आणि रुग्णालयात कोरोनाला पराभूत करणारा Doctor डॉक्टर दोघेही देशभक्तच आहेत. अशा सर्वच डॉक्टरांना आता राजाश्रय, लोकाश्रय मिळाला पाहिजे.