Raja Kolandar : प्रयागराजच्या इतिहासात एक अशी घटना घडली, ज्याने संपूर्ण देश हादरला. 2000 साली समोर आलेल्या या प्रकरणाने पोलिस आणि नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले. नरभक्षक वृत्ती असलेल्या या सिरीयल किलरचे नाव राजा राम निरंजन उर्फ कोलंदर होते. त्याने तब्बल 14 निष्पाप लोकांची हत्या केली आणि त्यांच्या मेंदूचे सूप करून पित असे. या क्रूर घटनेवर नेटफ्लिक्सवर नुकतीच एक डॉक्युमेंट्री प्रसारित झाली आहे, ज्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
राजा कोलंदर हा मूळचा प्रयागराजच्या यमुनापार शंकरगढ परिसरातील रहिवासी होता. तो एक मनोरुग्ण प्रवृत्तीचा व्यक्ती होता, ज्याला मेंदू खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते आणि अपार शक्ती मिळते, अशी अंधश्रद्धा होती. या अंधश्रद्धेमुळे त्याने निर्घृणपणे 14 लोकांची हत्या केली.
हेही वाचा : ‘डोळ्यात अश्रू अन्…’, शिवगर्जना ऐकून अंगावर येईल काटा, तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कोलंदरने अनेक हत्याकांड घडवले, पण 2000 साली पत्रकार धीरेंद्र सिंह यांच्या हत्येनंतर त्याचे क्रौर्य उघडकीस आले. पोलिसांनी तपास करताना त्याच्या घरातून मृतदेहांचे अवशेष आणि त्याच्या गुन्ह्यांची माहिती असलेली एक डायरी जप्त केली. ही डायरी वाचून पोलिस हादरले. त्याने स्वतःच्या गुन्ह्यांची संपूर्ण नोंद त्या डायरीत ठेवली होती.
राजा कोलंदरने आपल्या प्रत्येक शिकार अगोदर काळजीपूर्वक निवडली. तो लोकांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकून देत असे किंवा मृतदेह पुरत असे. पण त्याहून भयानक बाब म्हणजे तो त्यांच्या मेंदूचा सूप करून ते पित असे. ही क्रूर आणि विकृत पद्धत त्याच्या मानसिक आजाराचे द्योतक होती.
राजा कोलंदरच्या या गुन्ह्यात त्याचा मेहुणा बछराजदेखील सामील होता. पोलिसांनी या दोघांना अटक केली आणि त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात आला. तब्बल 11 वर्षांपर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर 1 डिसेंबर 2012 रोजी अलाहाबाद सत्र न्यायालयाने राजा कोलंदर आणि त्याच्या साथीदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आजही तुरुंगात भोगतोय शिक्षा
राजा कोलंदर आजही तुरुंगात आहे. त्याच्या क्रूर कृत्यांमुळे संपूर्ण देशभरात भीती आणि संतापाची लाट उसळली होती. सध्या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंट्रीमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजा कोलंदरची ही कथा माणसाच्या क्रौर्याची आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात गेलेल्या विकृत मानसिकतेची साक्ष देणारी ठरली आहे.