Donald Trump administration’s new bill : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या टॅरिफनंतर आता त्यांच्या नव्या विधेयकाने अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटताना दिसत आहे.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत आणि वादात अडकले आहेत. त्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांची पाठवणी आणि जगभरातील देशांवर सरसकट रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय वर्तुळातून तीव्र पडसाद उमटले.
आता लोकप्रतिनिधी सभागृहात डोनाल्ड ट्रम्प सरकारने प्रस्तावित केलेले नवीन विधेयक तिथे राहणाऱ्या ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे.
अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर झालेल्या या विधेयकामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत शिक्षण किंवा त्यानंतर तिथे कामाचा अनुभव घेण्यासाठी व्हिसा नियमांमध्ये या विधेयकामुळे मोठे फेरबदल होणार आहेत. हे विधेयक अमेरिकन काँग्रेसने पारित केल्यास तिथे राहणाऱ्या अशा भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने देश सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.
या विधेयकामुळे अमेरिकेत राहणाऱ्या सर्व विदेशी विद्यार्थ्यांच्या वास्तव्यावर टांगती तलवार आली आहे. यात प्रामुख्याने एसटीईएम (सायन्स, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, वैद्यकीय) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शनल प्रॅक्टिलक ट्रेनिंगचा पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण व त्यानंतर करिअर घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी अमेरिका सरकारने विविध विद्यार्थी आंदोलनातील परदेशी विद्यार्थ्यांना मेल पाठवून त्यांना देश सोडण्यास सांगितले होते.
काय आहे ओपीटी उपक्रम?
ओपीटी उपक्रमांतर्गत अमेरिकेत पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काम शोधण्यासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांच्या व्हिसाची मुदत एक वर्षासाठी वाढवता येते. ही एक वर्षाची मुदत नंतर आणखी दोन वर्षांसाठी वाढवता येते. यासाठी तुम्ही एसटीईएम अभ्यासक्रमाचे पदवीधर असणे आणि अमेरिकेत एखाद्या नामांकित व्यक्ती वा संस्थेत अनुभवासाठी काम करत असणे ही अट ठेवण्यात आली आहे. पण, नवीन विधेयकात विद्यार्थ्यांसाठीचा ओपीटीचा पर्यायच काढून घेण्याचे प्रस्तावित आहे