एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य असेल. या काळात, जर एखाद्या प्रवाशाने पैसे भरण्यासाठी रक्कम रोख वा अन्य पर्यायांद्वारे भरण्याचा प्रयत्न केल्यास त्यास दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. यासंदर्भात सार्वजनिक सूचना देखील जारी करण्यात आली आहे. फास्टॅगबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर न्यायालयाने १ एप्रिलपासून नवीन नियमानुसार सर्व परिस्थितीत फास्टॅग वापरावा असा निर्णय दिला.
फास्टॅगचा वापर
एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जनतेसाठी एक नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये १ एप्रिलपासून फास्टॅग वापरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. हे पाऊल उचलण्यामागील कारण म्हणजे टोल कामकाजात सुधारणा करणे. जे १ एप्रिलपासून फास्टॅग वापरणार नाहीत त्यांच्यासाठी कॅश, कार्ड आणि यूपीआयसारखे पर्याय देखील दिले जातील, परंतु त्यांना यासाठी दुप्पट पैसे द्यावे लागतील.
कोणते टोलनाके?
MSRDC अंतर्गत मुंबईत प्रवेश करण्यासाठी काही ठिकाणे आहेत, ज्यात दहिसर, मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली आणि वाशी यांचा समावेश आहे.याशिवाय, वांद्रे-वरळी सी लिंक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेस वे, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजी नगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, काटोल बायपास आणि चिमूर-वरोरा-वाणी महामार्ग यासह इतर टोल केंद्रांनाही १ एप्रिलपासून फास्टॅगद्वारे पैसे भरावे लागतील.
या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर, या टोलमधून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, जो रोख किंवा UPI द्वारे पैसे भरतो, त्याला दुप्पट पैसे द्यावे लागतील. तथापि, हलक्या वाहनांना, राज्य परिवहन बसेस आणि शालेय बसेसना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.