---Advertisement---
मुंबई, प्रतिनिधी : जेष्ठ व्यासंगी इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे २६ मार्च रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मराठेशाहीचा दबलेला आणि दुर्लक्षित इतिहास समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. पवार यांनी आपल्या आयुष्यभर केले. त्यांच्या संशोधनपूर्ण लेखनामुळे नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा सखोल परिचय झाला. त्यांनी ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’सारखा प्रमाण ग्रंथ लिहून इतिहासातील स्त्री-नेतृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
तसेच राजाराम महाराज आणि सेनापती संताजी घोरपडे यांसारख्या मराठेशाहीतील पराक्रमी व्यक्तींचा बुलंद इतिहास त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी इतिहासाचा अमूल्य ठेवा समाजासमोर आणला. त्यांच्या ग्रंथांचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले असून महाराष्ट्राचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, डॉ. पवार यांनी इतिहास संशोधनाला पूर्णतः वाहून घेतले होते. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखन आणि संशोधन प्रकल्पांना मोठी चालना दिली. त्यांच्या कार्यामुळे शिवचरित्र, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी विपुल संदर्भ साहित्य उपलब्ध झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्रातील एक अभ्यासू मार्गदर्शक हरपला असून, ही महाराष्ट्राची मोठी हानी असल्याची भावना व्यक्त होत आहे.









