डॉ. मोहनजी भागवत ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे साधक, राष्ट्रनिर्माणाचे मार्गदर्शक

---Advertisement---

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज ११ सप्टेंबर खरे तर हा दोन परस्परविरोधी घटनांचे स्मरण करून देणारा दिवस. यापैकी पहिली घटना म्हणजे १८९३ सालची. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये आपले ऐतिहासिक भाषण केले होते. ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’, आपल्या भाषणातील या अवघ्या काही शब्दांनी त्यांनी सभागृहात उपस्थित हजारो लोकांची मने जिंकली होती. त्यांनी भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेची आणि विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाची जगाला ओळख करून दिली. आता दुसरी घटना म्हणजे ९/११ च्या क्रूर दहशतवादी हल्ल्यांची. खरे तर, दहशतवाद आणि कट्टरतेच्या धोक्यामुळे याच विश्वबंधुत्वाच्या तत्त्वावर हल्ला झाला होता.
या दिवसाची दखल घ्यायला लावणारी आणखी एक बाब म्हणजे, आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लाखो लोक, त्यांचा परमपूज्य सरसंघचालक असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात. होय, मी डॉ. मोहनजी भागवत यांच्याबद्दलच बोलतोय. महत्त्वाचा योगायोग असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शताब्दी साजरी करत असलेले वर्ष त्यांच्याही ७५ व्या वाढदिवसाचे वर्ष आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला जवळून काम करण्याचे अहोभाग्य लाभले. माझ्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात मी त्यांच्याबद्दल अगदी सविस्तर लिहिले आहे. कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित असूनही, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी स्वतःला वाहून घेतले होते. गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मधुकरराव यांची राष्ट्रनिर्माणासाठीची तळमळ इतकी होती की, त्यांनी आपला मुलगा असलेल्या मोहनजी यांची जडणघडणच भारताच्या पुनरुत्थानासाठी केली होती. जणू काही स्वतः पारसमणी असलेल्या मधुकररावांनी मोहनजींच्या रूपात दुसरा पारसमणीच घडवला होता. मोहनजी हे १९७० च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले. प्रचारक हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला, कदाचित प्रचारक म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा किंवा विचारांचा प्रचार, प्रसार करणारी व्यक्ती असे वाटू शकते. परंतु जे कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत, त्यांना याची जाणीव आहे की, प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये, देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन हजारो तरुणांनी भारत प्रथम हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले घरदार आणि कुटुंबाचा त्याग करत, आपले आयुष्य समर्पित केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील त्यांची सुरुवातीची वर्षे भारतीय इतिहासातील एका अतिशय काळ्या कालखंडात गेली. याच काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर कठोर आणिबाणी लादली होती. लोकशाही तत्त्वांना महत्त्व देणाऱ्या आणि भारत समृद्ध व्हावा अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणिबाणीविरोधी चळवळ बळकट करणे स्वाभाविक होते. मोहनजी आणि असंख्य स्वयंसेवकांनी नेमके हेच केले. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि मागास भागात, विशेषतः विदर्भात व्यापक प्रमाणात काम केले. यामुळे गरीब आणि दलितांना भेडसावणाऱ्या आव्हानांची त्यांना जाणीव झाली. गेल्या काही वर्षांमध्ये भागवतजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध पदे भूषवली. यातील प्रत्येक कर्तव्य त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले. १९९० च्या दशकात अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणून मोहनजी यांच्या कार्याचे आजही अनेक स्वयंसेवक स्नेहपूर्वक स्मरण करतात. या काळात त्यांनी बिहारच्या गावांमध्ये काम करताना अमूल्य वेळ व्यतीत केला. या अनुभवांमुळे तळागाळातील समस्यांशी ते अधिक खोलवर जोडले गेले. २००० मध्ये ते सरकार्यवाह झाले आणि येथेही त्यांनी आपल्या कामाच्या अनोख्या शैलीने कठीण परिस्थिती सहजतेने आणि अचूकतेने हाताळली. २००९ मध्ये ते सरसंघचालक बनले आणि आजही ते अतिशय उत्साहाने काम करत आहेत.

सरसंघचालक असणे ही केवळ संघटनात्मक जबाबदारी नाही. असाधारण व्यक्तींनी वैयक्तिक त्याग, उद्देशाची स्पष्टता आणि भारतमातेप्रति अतूट समर्पणासह ही भूमिका पार पाडली आहे. मोहनजी यांनी जबाबदारीच्या विशालतेला पूर्ण न्याय देण्याबरोबरच, स्वतःची ताकद, बौद्धिक खोली आणि सहृदय नेतृत्व याचीही जोड दिली आहे, जे सर्व राष्ट्र प्रथम या तत्त्वाने प्रेरित आहे. जर मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेल्या आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केलेले दोन गुण मी आठवायचे म्हटले तर ते आहेत, सातत्य आणि जुळवून घेणे. त्यांनी नेहमीच अतिशय कठीण प्रसंगांमध्ये संघटनेचे नेतृत्व केले आहे, आपल्या सर्वांना अभिमान असलेल्या मुख्य विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही आणि त्याच वेळी समाजाच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण केल्या आहेत. त्यांचे तरुणाईशी अगदी सहज नाते आहे. आणि म्हणूनच, त्यांनी नेहमीच अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात सामील करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते अनेकदा सार्वजनिक भाषणात आणि लोकांशी संवाद साधताना दिसतात, जे आजच्या गतिमान आणि डिजिटल जगात खूप लाभदायक ठरले आहे.

व्यापकपणे सांगायचे तर, संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वांत परिवर्तनकारी कालखंड मानला जाईल. गणवेशातील बदलापासून ते शिक्षा वर्गामध्ये (प्रशिक्षण शिबिरांमध्ये) सुधारणा करण्यापर्यंत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. खास करून कोविड काळात मोहनजींनी केलेले प्रयत्न मला आठवतात, जेव्हा मानवजातीने आयुष्यात पहिल्यांदाच अशा महामारीचा सामना केला होता. त्या काळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पारंपरिक उपक्रम सुरू ठेवणे आव्हानात्मक बनले होते. मोहनजींनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. जागतिक आव्हानांच्या संदर्भात, संस्थात्मक चौकटी विकसित करताना ते जागतिक दृष्टिकोनांशी निगडित होते. त्या वेळी, सर्व स्वयंसेवकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करताना गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. आम्ही आमचे अनेक कष्टकरी स्वयंसेवक देखील गमावले, परंतु मोहनजी यांची प्रेरणा अशी होती की त्यांचा दृढनिश्चय कधीही डगमगला नाही.

या वर्षारंभी, नागपुरातील माधव नेत्र चिकित्सालयाच्या उद्घाटनादरम्यान, मी असे म्हटले होते की, संघ हा अक्षयवटासारखा आहे, एक शाश्वत वटवृक्ष जो आपल्या देशाच्या राष्ट्रीय संस्कृती आणि सामूहिक चेतनेला ऊर्जा देतो. मूल्यांमध्ये रुजवण झाल्याने या अक्षयवटाची मुळे खोलवर आणि मजबूत आहेत. डॉ. मोहनजी भागवत यांनी या मूल्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी ज्या आत्मीयतेने स्वतःला समर्पित केले आहे ते खरोखरच प्रेरणादायी आहे.

मोहनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव. श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली आहे. हा पैलू सखोल दृष्टिकोन सुनिश्चित करण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि नेतृत्वात संवेदनशीलता आणि प्रतिष्ठेची भावना देखील आणतो.

विविध जनआंदोलनांमध्ये त्यांनी नेहमीच दाखवलेल्या औत्सुक्याविषयी देखील मला इथे व्यक्त व्हायचे आहे. स्वच्छ भारत मिशनपासून ते बेटी बचाओ बेटी पढाओपर्यंत सर्वच चळवळींद्वारे जोम वाढवण्याचे आवाहन ते नेहमीच संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक परिवाराला करतात. सामाजिक कल्याणाला वाव देण्यासाठी, सामाजिक सुसंवाद, कौटुंबिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, राष्ट्रीय हित आणि नागरी कर्तव्ये यांचा समावेश असलेले ‘पंच परिवर्तन’ मोहनजींनी मांडले. हे सर्व क्षेत्रांतील भारतीयांना प्रेरणा देऊ शकतात. प्रत्येक स्वयंसेवक एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र घडण्याचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी, स्पष्ट दृष्टिकोन आणि निर्णायक कृती दोन्ही आवश्यक आहेत. मोहनजी या दोन्ही गुणांनी परिपूर्ण आहेत.

भागवतजी हे नेहमीच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या तत्त्वाचे खंदे पुरस्कर्ते राहिले आहेत, भारताच्या विविधतेत आणि आपल्या भूमीचा एक अविभाज्य भाग असलेल्या अनेकविध संस्कृती आणि परंपरांवर त्यांना गाढ विश्वास आहे. त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा वेळापत्रकात देखील मोहनजी संगीत आणि गायन हे आपले छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात. कित्येक भारतीय संगीत वाद्ये वाजवण्यात ते पारंगत असल्याचे फार थोड्या लोकांना माहीत असावे. त्यांची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते. यावर्षी, अगदी थोड्याच दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी पूर्ण करणार आहे. यावर्षी विजयादशमी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि रा. स्व. संघाचा शताब्दी सोहळा एकाच दिवशी येत असून हा उत्तम योगायोग आहे. संघाशी निगडित असलेल्या भारतातातील आणि परदेशातील लाखो लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल आणि आम्हाला या काळात संघटनेला मार्गदर्शन करणारे अतिशय सुज्ञ आणि कठोर परिश्रम करणारे सरसंघचालक म्हणून मोहनजी लाभले आहेत. मोहनजी वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण असून जेव्हा जेव्हा आपण या सीमारेषा ओलांडतो आणि सर्वांना आपले मानतो तेव्हा समाजात विश्वास, बंधुभाव आणि समता वाढीस लागते, हे सांगून मी समारोप करतो. मी पुन्हा एकदा मोहनजींना मातृभूमीची सेवा करण्यासाठी दीर्घ आणि आरोग्यमय आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---