---Advertisement---
जळगाव : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही देशासह जगाची समस्या आहे. ही समस्या कशी रोखता येईल, यावर जळगावात पुणे येथील रिफ्लेक्शन फाउंडेशनतर्फे ‘पालक शाळा’ उपक्रमांतर्गत ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या… काय घडतंय? काय बिघडतंय?’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी काही मोलाचे सल्ले दिले. जाणून घेऊया काय आहेत सल्ले…
डॉ. जोशी यांनी शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षक, शिक्षण संस्थाचालक, समुपदेशक, पालकांना साद घातली. विचारमंचावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा महाजन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. जगात दरवर्षी सुमारे सात लाख 20 हजार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात. आणि दीड कोटी विद्यार्थी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना होतात. महाराष्ट्रात 2021 मध्ये 13 हजारांवर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्यांची समस्या ही आजची नसून, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली तेव्हापासून आहे. आज आत्महत्यांचे प्रमाण हे धक्कादायक आहेत आणि आपणाला यातून स्वतः काही करता येते का? याचे परीक्षण आपण करत आहोत. यात काहींनी स्वतः, तर काहींनी दुसऱ्यांना दोष दिला आहे. या गोष्टींना तुम्ही-आम्ही सर्वच जबाबदार आहोत. याला शाळा, पालक जबाबदार आहेत. अशा एकालाच दोष देणे योग्य असणार नाही. हा सर्वांचा दोष असून, यासाठी आपणाला काय काय बदलावे लागेल, काय काय करावे लागेल, याचा आपण विचार केला पाहिजे. पालकांच्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात. आई-वडिलांशी मुलांचे कशा प्रकारचे संबंध असतात, याचा आपण विचार केला पाहिजे. यासोबतच वडीलधाऱ्यांशी त्यांचे संबंध कसे आहेत, हेदेखील महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद करताना विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस केवळ शाळा, पालक हेच नव्हे; तर संपूर्ण समाजाच जबाबदार आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मुलांमध्ये काय कमी आहे, मुलांमध्ये काय चांगले आहे, याचाही विचार पालकांसह शिक्षकांनी करावा. पालकांनी थेट मुलांचा दोष न दाखविता, अगोदर चांगल्या गोष्टी मांडत कौतुकाची मुलाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत त्याच्यातील दोष अथवा उणीव दाखवून द्या. मुलातील थेट दोष दाखविल्यानंतर त्याच्यात बंडखोरीची भावना निर्माण होईल, असेही डॉ. जोशी म्हणाले.
शाळांतील मुलांच्या वर्तणुकीबद्दलही डॉ. जोशी यांनी भाष्य केले. विद्यार्थी हे 9 ते 17 वर्षे वयोगटातील असतात. त्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा काळ आहे; परंतु प्रत्यक्षात अजून लहान मुलेच आहेत. शाळांमध्ये मुलाला योग्य शिक्षण मिळते का? यावर पालकांनी थेट शिक्षकांशी समन्वय ठेवण्याची गरज आहे. शाळांमध्ये अभ्यासासोबत मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे धडेही गिरवायला हवेत. कोरोना काळात शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले गेले. त्यावेळी मोबाइलचा वापर अधिक झाला. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर आता कायमचा झाला आहे. पण आता कोरोना काळ जाऊन चार वर्षे झाली आहेत. अजूनही शाळांकडून विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांच्या माध्यमातून गृहपाठ दिला जातो. ते आता बंद झाले पाहिजे. सद्यःस्थितीत शाळांमध्ये आनंददायी शिक्षण कमी प्रमाणात आहे. एकेका वर्गात 90 ते 100 विद्यार्थी असतात. त्यामुळे अभ्यासक्रमात पकड घेणे सोपे नसते आणि मग ताण वाढतो. त्याचा परिणाम चाचणी अथवा परीक्षांमध्ये दिसून येतो, ज्यामुळे तणाव आणखी वाढतो, असेही डॉ. जोशी म्हणाले. पालकांनी मुलांच्या मनाचा वेध घेणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्यासोबत बराच वेळ घालवणं महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यांच्या मनात काय चालले आहे, ते उघडपणेही मुले पालकांशी बोलू शकतील. शाळांमध्ये प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी माहिती देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, स्वामी विवेकानंद केंद्राच्या श्रृती मुजुमदार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे पालक पंकज नाले, ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिती झांबरे, जळगाव सायबर सेलचे सचिन सोनवणे, अशोक पाटील, योगेश बोरसे आदींनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या बाबींचा उल्लेख करीत त्यावर काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे, यावर आपापल्या भावना व्यक्त केल्या. रत्नाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. महेश गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वीणा महाजन यांनी ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या… काय घडतंय? काय बिघडतंय?’ यावर कृती आराखडा सादर करीत आभार मानले.
डॉ. जोशी उवाच…
– शाळांनी मोबाइलवर गृहपाठ पाठविणे बंद करावा.
– शिक्षकांनी पालकांशी समन्वय ठेवत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा करावी.
– शिक्षण संस्थांकडून शिक्षकांसह पालकांच्या मुलांच्या भविष्यातील करिअर आणि शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चेसाठी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण कार्यशाळा घ्याव्यात.
– इमारतीतील बंदिस्त शाळा बाहेर काढा.
– प्रत्येक शाळेत शिक्षक-पालकांचा सपोर्ट ग्रुप नियुक्त करा. गरज असलेल्या विद्यार्थ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून समुपदेशन करा.
– शाळांमध्ये व्यसनांवर प्रबोधन व्हावे. त्यातून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना अवगत करा.
– शाळांमध्ये अभ्यासक्रमासोबत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षणाबाबत अवगत करा.